वेतन वाढीचे आदेश काढण्यासाठी लाच घेताना दोघांना अटक
महाराष्ट्र 24न्यूज
हिंगोली : आदर्श शिक्षक पुरस्काराचे वेतनवाढीचे आदेश काढण्यासाठी २३ हजाराची लाच स्विकारताना शिक्षण विभागातील दोघांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्यावतीने १३ जानेवारी रोजी दुपारी रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
फिर्यादीने शिक्षण विभागात 'आदर्श शिक्षक पुरस्कारा'च्या वेतनवाढीसाठी प्रस्ताव सादर केला होता. यासाठी २०१९ पासून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मात्र, शिक्षण विभागाकडून प्रकरण प्रलंबित ठेवले जात होते. ज्यादा वेतनवाढीचे आदेश काढण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर, ३ जानेवारी २०२२ रोजी सदरील आदेश काढण्यात आले. मात्र, तक्रारदार शिक्षकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली होती’.
लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्यावतीने या तक्रारीची पडताळणी करून १३ जानेवारी रोजी जिल्हा परिषद कार्यालयात सापळा लावण्यात आला होता. अखेर शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक सचिन अडबलवार याला जिल्हा परिषदेच्या कॅन्टिनमध्ये २० हजाराची लाच घेताना पकडले आहे. तर, शिक्षण विभागात ३ हजाराची लाच घेतांना कार्यालयीन अधिक्षक सचिन मिसलवार याला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे नावही पोलिसांच्या तपासात असल्याची माहिती आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे उपाधिक्षक निलेश सुरडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख युनूस, जमादार विजय उपरे, तान्हाजी मुंडे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, सुजित देशमुख, राजाराम फुफाटे, रूद्रा कबाडे .सुकला यांच्या पथकाने केली आहे.
إرسال تعليق