१८ हजाराची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात
हिंगोली, : पुसेगाव ता.सेनगाव सज्जाच्या तलाठ्यास वाटणीपत्रावरून फेरफार करण्यासाठी १८ हजार रुपयाची लाच घेताना सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील पुसेगाव सज्या अंतर्गत एका शेतकऱ्याचा वाटणी पत्रानुसार जमिनीचा फेरफार घ्यावयाचा होता. यासंदर्भात संबंधित शेतकऱ्याने पुसेगाव सजाचे तलाठी एम. ए. शेख याच्याकडे अर्जही दाखल केला . मात्र त्यासाठी तलाठी शेख याने चाळीस हजार रुपयांची मागणी केली.
त्यानंतर तडजोडी अंती ३५ हजार रुपये देण्याचे मान्य झाले. त्यातील पहिला हप्ता १८ हजार रुपये सोमवारी देण्याचे ठरले होते. त्या प्रमाणे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. त्यावरून लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक निलेश सुरडकर , पोलिस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर , जमादार विजय उपरे , रुद्रा कबाडे , तानाजी मुंडे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, हिम्मतराव सरनाईक , राजाराम फुफाटे, योगीता अवचार आदीच्या पथकाने पुसेगाव येथील तलाठी कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला होता. ठरल्याप्रमाणे सोमवारी दुपारी तीन वाजता तलाठी शेख याने अठरा हजार रुपयांची लाच घेताच लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
إرسال تعليق