बासंबा पाटीजवळी ब्लॅक स्पॉटची संयुक्त पाहणी; रॅबलर स्ट्रीप बसवण्याच्या सुचना
हिंगोली प्रतिनिधी
शहरालगत बासंबा पाटीजवळील ब्लॅक स्पॉटची प्रशासनाने गुरुवार दि.३० जुन रोजी दुपारी संयुक्त पाहणी केली. यावेळी अपघात टाळण्यासाठी रॅबलर स्ट्रीप बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात मागील काही दिवसांत अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अपघात टाळण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या पुढाकारांने रस्ता सुरक्षा अभियान व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वीच रस्ता सुरक्षेबाबत बैठक झाली होती. त्यानुसार जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट ठरवून त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाय योजना करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार गुरुवारी जिल्हाधिकारी पापळकर, पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत जोशी यांच्यासह राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व कंत्राटदार यांच्या उपस्थितीत बासंबा पाटी जवळ पाहणी करण्यात आली. या ठिकाणी वाहनांच्या वेगामुळे अपघात होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आल्यानंतर या भागात रॅबलर स्ट्रीप बसवण्याच्या सुचना देण्यात आल्या. या शिवाय काही ठिकाणी आवश्यक दुरुस्ती करण्याबाबतही पापळकर यांनी राष्ट्रीय महामार्ग कार्यालय व कंत्राटदारांना सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, जिल्हयातील इतर ठिकाणीही अशा प्रकारचे संयुक्त पाहणी करून त्या ठिकाणी होणारे अपघात टाळण्यासाठी काय उपाय योजना करता येतील याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे पोलिस विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा