स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमास
रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
हिंगोली प्रतिनिधी
15 ऑगस्ट 2022
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या‘अब तुम्हारे हवाले वतन साथियो’या देशभक्तीपर गाण्याला रसिंकाची दाद
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर सादर केलेले नृत्य ठरले लक्षवेधी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आज येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात देशभक्तीपर गीत गायन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आले. या कार्यक्रमास रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. परंतु जिल्हाधिकारी गायन करीत असतांना विज पुरवठा झाला होता पुन्हा ४० मिनिटांनी विज पुरवठा सुरुळीत झाल्यावर पुन्हा कार्यक्रम सुरु झाला. पुन्हा शेवटीही विज पुरवठा बंद झाला. परंतु शेवट पर्यंत देशभक्तीपर गितांची रेलचेल असल्याने उपस्थित नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार नवनाथ वगवाड नायब तहसिलदार खंडागळे याची प्रमुख उपस्थिती होती.
देशभक्तीपर गीत गायन व सांस्कृतिक समारोहाची देशभक्तीने भारावलेल्या वातावरणात भारत माता की जय, वंदे मातरम जयघोषाने विद्यार्थी-विद्यार्थींनी, नागरिकांच्या उपस्थितीत जल्लोषात सुरुवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियो’ हे देशभक्तीपर गीत सादर करुन रसिकांची दाद मिळवली आणि या गाण्यास वन्स मोर मिळवला. तसेच उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी ‘मेरा मुलूक मेरा देश, मेरा ये वतन’ या गाण्याद्वारे प्रेक्षकांची दाद मिळवली. तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कुरवाडे यांनीही ‘ये देश के यारो क्या कहना’ यासह विविध देशभक्तीपर गाण्यावर प्रेक्षकांची दाद मिळवली. तसेच स्वरगांधार ऑर्केस्ट्राच्या टीमने एकापेक्षा एक बहारदार देशभक्तीपर गीत सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यावेळी स्विस ॲकडमी इंग्लीश स्कूल व डी इफेक्ट डान्स ॲकडमीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर बहारदार अशी नृत्ये सादर केली. पृथ्वी वाढवे या चिमुकलीने देशभक्तीपर हिंदी कविता सादर केली. कलानंद जाधव यांनी माझ्या देशाचा गौरव या विषयावर हिंदीत कविता सादर केली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले होते. या वातावरणात विद्यार्थ्यांनी केलेल्या समूह नृत्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतूक केले.
उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतीकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फूल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी या उद्देशाने या देदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आपल्या प्रास्ताविकात दिली .
देशभक्तीपर गाण्याच्या माध्यमातून बहारदार शैलीतून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंतनू पोले यांनी केले. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी विविध पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थींनी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला.
إرسال تعليق