डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शेतकर्याचा मृत्यु; दोघांना कारणे दाखवा नोटीस ; घरातला कर्ता गेल्याने कुटूंबावर दुःखाचा डोंगर
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा आलबेल कारभार...!
वसमत
तालुक्यातील वापटी येथे विहीरीत पडून जखमी झालेल्या शेतकर्याला पांगरा शिंदे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारी नसल्याने वेळेत मदत मिळाली नसल्याने शेतकर्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि.१ सप्टेंबर रोजी रात्री घडली. पांडूरंग नागोराव पानपट्टे (३२) असे मृत झालेल्या शेतकर्याचे नाव आहे.
वसमत तालुक्यातील वापटी येथील शेतकरी पांडूरंग नागोराव पानपट्टे हे गुरुवारी सायंकाळी शेतात फवारणीचे काम करत होते. त्यासाठी पाणी आणण्यासाठी ते विहीरीवर गेले असता त्यांचा पाय घसरल्याने ते विहीरीत पडले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. मात्र, पंधरा ते वीस मिनीटानंतरही पांडूरंग हे पाणी घेऊन कसे आले नाही हे पाहण्यासाठी इतर शेतकरी विहीरीकडे गेले असता पांडुरंग पानपट्टे विहीरीत पडलेले दिसून आले. त्यांना ग्रामस्थांनी विहीरीबाहेर काढून पुढील उपचाराकरिता नजीक असलेल्या पांगरा शिंदे येथील प्राथमिक केंद्रात हलवले. मात्र केंद्रात डॉक्टर हजर नसल्यामुळे नातेवाईकांनी डॉक्टरांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित वैद्यकीय अधिकारी बराच वेळ होऊनही हजर होत नसल्याने, नातेवाईकांनी वसमत तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या अधिकार्यांना संपर्क केला. वैद्यकीय अधिकारी पाठवले, पण तोपर्यंत उशीर झाला होता असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी गावकरी व नातेवाईकांना शांत करून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.काळे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर रात्री उशीरा कुरुंदा प्राथमिक आरोग्य केंदाचे वैद्यकीय अधिकारी पाठवून उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मयत पांडूरंग पानपट्टे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे कुठलेही नियंत्रण नसल्यामुळे ग्रामीण भागात आलबेल कारभार कारणीभूत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजी पवार यांचे यांकडे दुर्लक्ष आहे. वैद्यकीय अधिकार्यांना नोटीस
या प्रकरणात पांगरा शिंदे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी डॉ.महेश चिटमोगरेकर, डॉ.ओंकार महाजन यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
- डॉ. संदीप काळे, तालुका आरोग्य अधिकारी, वसमत
टिप्पणी पोस्ट करा