हिंगोलीत नवसाचा मोदक; भाविकांसाठी स्वतंत्र वाहन पार्कींग, तगडा पोलिस बंदोबस्त तैनात
महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क
8 सप्टेंबर 2022
हिंगोली
येथील विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी तसेच नवसाचा मोदक घेण्यासाठी आज शुक्रवार दि.९ सप्टेंबर रोजी सुमारे 3 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. त्यासाठी पोलीस विभागाने तयारी केली असून स्वतंत्र पार्किंग व्यवस्था केल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी दिली.
विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह बाहेर राज्यातुनही मोठ्या प्रमाणात भाविक येणार आहेत. त्यासाठी सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे. पोलिस विभागाने बॅरिकेट तयार केले असून यातूनच भाविकांना दर्शनासाठी सोडले जाणार आहे. या ठिकाणी वाशिम, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव या भागातून येणार्या भाविकांची वाहने उभे करण्यासाठी रामलीला मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय जवळा पळशी मार्गाने येणार्या भाविकांच्या वाहनासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर पार्किंगची व्यवस्था केली आहे.
शुक्रवार दि.९ सप्टेंबर रोजी इंदिरा गांधी चौक, महात्मा गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिरापर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशासाठी मनाई असणार आहे. त्यामुळे कोणीही वाहने आणण्याचा प्रयत्न करू नये.
पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्याकडून महत्वपूर्ण भाविकांना सूचना
भाविकांना पोलिसांच्या सूचना
दर्शनासाठी येणार्या महिला भाविकांनी सोन्याचे दागिने परिधान करून येऊ नये. लहान बालके सोबत असल्यास त्यांच्या खिशामध्ये पालकांची नाव व मोबाईल नंबर असलेली चिठ्ठी ठेवावी. बालक हरवल्याचे लक्षात आल्यास तातडीने बंदोबस्तावरील पोलीस कर्मचार्याशी संपर्क साधावा. दर्शन रांगेमध्ये छायाचित्रीकरण केले जाणार असून सीसी टीव्ही देखील बसवण्यात आले आहेत. याशिवाय आवश्यक त्या ठिकाणी दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
चिंतामणी संस्थेच्या वतीने भाविकांना 36 हजार खुर्च्याची बसण्यासाठी व्यवस्था
दिलीप बांगर यांची माहिती
भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य विभागाचे पथक तैनात केले जाणार असून स्वतंत्र रुग्णवाहिका देखील असणार आहे. भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसरात गर्दी करू नये तसेच नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी केले आहे.
भाविकांची गर्दी लक्षात घेता चोरीचे प्रकार होऊ नयेत यासाठी साध्या वेशातील पोलिसांची पथके तैनात केली जाणार आहेत. सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय यांची पथकेही या भागात लक्ष ठेवून असणार आहेत.
إرسال تعليق