हिंगोली शहरातील महादेववाडी भागात तीन आरोपीतांनी हातात कोयते घेऊन काही जणांच्या घरासमोरील ऑटो व मोटारसायकलची नासधूस करून जवळपास दीड लाख रुपयाचे नुकसान केल्याने हिंगोली शहर पोलिसात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तीन आरोपींपैकी एकजण तडीपार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हिंगोली शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था राखली जात असताना अचानक महादेववाडी भागामध्ये काही ऑटोसह मोटार सायकलच्या तोडफोडीची घटना घडली. त्यामुळे जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. ज्यामध्ये काही ऑटोसह
मोटारसायकलची नासधूस केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर नासधूस केलेल्या ऑटो चालकासह अनेकांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन घटनेची माहिती दिली. या प्रकरणात पांडूरंग नथूजी मोटे रा. दत्तनगर या ऑटो चालकाने १९ ऑक्टोबरला फिर्याद दिली. ज्यामध्ये विशाल सांगळे, शेख अलताफ शेख युसूफ उर्फ पतल्या रा. हिंगोली आणि इतर आरोपीने मोटे यांच्यासह साक्षीदाराच्या ऑटोसह मोटार सायकलची नासधूस करून १ लाख ४६ हजार रुपयाचे नुकसान केले. तसेच शेख तौफीक शेख यांच्या घरासमोरील पत्राच्या शेडमध्ये लावलेल्या ऑटोला व घराला जाळण्याचा प्रयत्न केला. याचवेळी त्यांनी आवाज दिल्यानंतर आरोपींनी पलायन केले. विशेष म्हणजे विशाल सांगळे हा हिंगोली शहरातून तडीपार असताना देखील शहरात प्रवेश केल्याने या आरोपीविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विठूबोणे हे करीत आहेत.
إرسال تعليق