राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या बैठकीला मान्यवरांची उपस्थिती : जय्यत तयारी सुरु
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
20 नोव्हेंबर 2022
हिंगोली/- प्रतिनिधी/-
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा नियोजनाकरिता वसुंधरा फाऊंडेशनच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे. याकरिता जिल्ह्यातील क्रीडा प्रेमी, विविध क्षेत्रातील मान्यवरांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये पूर्वतयारी आढावा , खेळाडूंच्या सुविधा, याविषयी चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हा कबड्डी असोशिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने वसुंधरा फाऊंडेशन आयोजित कबड्डी चषक २०२२ तयारी बैठक रविवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. या बैठकीला हिंगोली जिल्ह्याचे भूमिपुत्र अप्पर जिल्हाधिकारी श्री. संजय काटकर, निवृत्त शिक्षण अधिकारी शिवाजी पवार, सेनेचे जिल्हाप्रमुख विनायक भिसे पाटील , जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, ओमप्रकाश देवडा पीपल्स को ओप बँकेचे अध्यक्ष सुनील देवडा, आय एम ऐ संघटनेचे अध्यक्ष डॉ. सचिन बगाडिया, उद्योजक सौरभ बडेरा, वसुंधरा फाउंडेशनचे गोविंद पाटील, जिल्हा कबड्डी असोशिएशनचे कोषाध्यक्ष प्रा. पंढरीनाथ घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यांनतर वसुंधरा फाऊंडेशनच्या आयोजित स्पर्धेच्या बैठकीचे रोपट्याला पाणी घालून उदघाटन करण्यात आले.
श्री. गोविंद पाटील यांनी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेविषयी प्रास्ताविक केले. जिल्ह्यातुन निवड केलेले १२ व राज्यभरातील निमंत्रित १२ संघ या स्परेधेमध्ये सहभागी होणार आहेत. हिंगोली जिल्ह्याच्या नावलौकिकामधे भर घालणारी ही स्पर्धा असुन याअगोदर जिल्हातील गटनिहाय, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धेस ०३ नोव्हेंबर पासून सुरुवात झालीआहे. हिंगोली जिल्ह्यातील कबड्डी विकसित व्हावी यासाठी वसुंधरा फाऊंडेशन बांधील आहे असे ते म्हणाले. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ही हिंगोलीच्या नावलौकिक वाढविणारी ठरेल यासाठी सर्वानी एकत्र येऊन प्रयत्न करूयात असे त्यांनी म्हटले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, डॉ. सचिन बगडिया, सुनील देवडा, विनायकराव भिसे पाटील, प्रा. पंढरीनाथ घुगे, शिवाजीराव पवार, उत्तमराव राठोड यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन स्पर्धा समनव्यक श्री. कल्याण देशमुख यांनी केले.
वसुंधरा फाऊंडेशन आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा हिंगोली येथील रामलीला मैदानावर दिनांक १० ते १२ डिसेंबर दरम्यान सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेमध्ये होणार आहेत. स्पर्धेकरिता मैदान समिती, निवास समिती, भोजन समिती, वाहतूक समिती, पार्किंग समिती यासह विविध समित्या स्थापन करण्यात येत असून यामध्ये ५० पेक्षा जास्त समिती सदस्य सहभागी आहेत, रामलीला मैदानावर भव्य प्रेक्षक गॅलरी, मंडप, आरोग्य पथकासाठी कक्ष, लायटिंग, सुसज्ज मैदान, व अन्य सुविधा उभारण्यात येणार आहेत. यासाठी सूक्ष्म नियोजन वसुंधरा फाऊंडेशनच्या वतीने बैठकीत करण्यात आले आहे. या बैठकीला जिल्हाभरातील संघटक, विविध क्षेत्रातील मान्यवर , क्रीडाप्रेमी, क्रीडाशिक्षक, प्राध्यापक व स्पर्धा संयोजन समिती सदस्य उपस्थित होते. या बैठकीच्या यशस्वीतेसाठी वसुंधरा फाऊंडेशनच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा