हिंगोली येथे ‘महासंस्कृती महोत्सव 2024’चा सोमवारी समारोप
कार्यक्रम सर्वांसाठी खुला
लख लख चंदेरी कार्यक्रमाची रसिकांना मिळणार अनुभूती
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
25 फेब्रुवारी 2024
हिंगोली , राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने जिल्ह्यात गुरुवारपासून पाच दिवशीय ‘महासंस्कृती महोत्सव’ सुरु असून, उद्या सोमवारी याचा समारोप होणार आहे.
उद्या सायंकाळी ६ वाजता स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी त्यांच्या कलाकृतींचे सादरीकरण हिंगोलीकरांना पाहायला मिळणार आहे.
राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात -अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या या महोत्सवात लख लख चंदेरी यासह स्थानिक कलाकारांच्या कलेची रसिकांना अनुभूती मिळणार आहे.
*सोमवारचे समारोपीय कार्यक्रम*
महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात सोमवार, दि. 26 फेब्रुवारी रोजी सायं. 5 वाजता हिंगोली येथील प्रथितयश कलावंताचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये उत्तम इंगोले यांचा चमू पोवाडा, शांताबाई पाईकराव यांचा चमू सामाजिक प्रबोधन, रामराव जाधव यांचा चमू लेहंगी नृत्य (बंजारा पारंपारिक नृत्य), नामदेव दिपके यांचा चमू लेक वाचवा-लेक शिकवा, प्रकाश दांडेकर यांचा चमू मतदार जनजागृती, शंतनू पोले यांचा चमू 'कोरलाय शिवबा काळजावर' या विषयावर सादरीकरण करणार आहे.
सायं. 6.30 वाजता लख लख चंदेरी-2024 कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. यासाठी पुष्कर श्रोत्री हे निवेदन करणार आहेत. राजेश्वरी खरात, गौरी कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, श्वेता खरात हे कलाकार नृत्य सादर करणार आहेत. यासाठी मयुर सुकाळे यांचे गायन असणार आहे. कमलाकर सातपुते आणि किशोरी अंबिये यांच्यासोबत 25 कलाकारांचा संच स्कीट सादर करणार आहे.
याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज सचित्र दालन व शस्त्र प्रदर्शन, राज्य संरक्षित स्मारके व गडकिल्ले यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यक्रम, प्रदर्शन तसेच वस्त्र संस्कृती दालन, हस्तकला वस्तू दालन, बचत गटांचे उत्पादन दालन, पर्यटनविषयक दालन उभारण्यात आले आहेत. तसेच कुस्ती, रांगोळी स्पर्धाही घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
*कार्यक्रम सर्वांसाठी खुला*
महोत्सवाचा उद्याचा समारोपीय दिवस असून, कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. कार्यक्रम प्रेक्षकांसाठी प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य तत्वावर आधारीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कार्यक्रमस्थळी लवकर येऊन आसनस्थ व्हावे व या महासंस्कृती महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
إرسال تعليق