कर्नाटक राज्यातून येणारा 28 लाख 60 हजार रुपयांचा गुटखा व मुद्देमाल पोलीसांच्या ताब्यात
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
17जुलै2027
हिंगोली. कळमनुरी ते आखाडा बाळापूर महामार्गावर कळमनुरी पासुन काही अंतरावर पोलिसांनी बुधवारी दिनांक १७ जुलै सकाळी ११ वाजता गुप्त माहीती आधारे तपासणी केलेल्या आयशर टेम्पो मध्ये ४५ पोते गुटखा आढळून आला आहे. सदर गुटखा कर्नाटकमधून आणण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले असून पोलिसांनी चालकाची चौकशी सुरु केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सण, उत्सव असल्यामुळे सर्व पोलिस अधिकार व कर्मचाऱ्यांना बंदोबस्ताचे नियोजन करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार कळमनुरी पोलिसांनी गावात तसेच मुख्य मार्गावर बंदोबस्त ठेवला होता.
कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावरून एका आयशर टेम्पोतून गुटखा वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक बसवंते, उपनिरीक्षक सतीष ठेंगे, जमादार दादा साहेब कांबळे, प्रशांत शिंदे, गजानन होळकर, कैलास सातव यांच्या पथकाने सकाळी आकरा वाजता वाहनांची तपासणी सुरु केली. यावेळी कळमनुरी च्या जवळ आलेल्या एका आयशर टेम्पोला थांबविल्या नंतर चालकाने उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी पक्का संशय असल्याने पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता त्यात गुटख्याची पोते आढळून आली.
पोलिसांनी सदर टेम्पो क्रमांक kA- 4-A -4122 कळमनुरी पोलिस ठाण्यात आणल्यानंतर तपासणी केली असता त्यात वजीर गुटख्याचे 45 पोते आढळून आले आहे. या पोत्यांची किंमत 21 लाख60 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. गटख्याची पोते व वाहन आयशर असे 28 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. पोलिसांनी चालकाची प्राथमिक चौकशीत केली असता त्याने कर्नाटक राज्यातील बिदर येथून गुटखा भरून नेण्याची सांगण्यात आले होते. मात्र नेमके गुटखा कोठे द्यायचा याची माहिती नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे आता पोलिसांनी त्याच्या मोबाईलवरून बिदरमधील व्यक्तीची माहिती घेण्याचे प्रयत्न चालविले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
टिप्पणी पोस्ट करा