असोल्यातील मराठा बांधवांच्या वतीने ‘त्या’ निवेदनाचा निषेध
मागण्या तातडीने पूर्ण करा; अन्यथा आंदोलन
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
28जुलै 2024
हिंगोली :
औंढा नागनाथ तालुक्यातील असोला येथील गोळीबार प्रकरणी २७ जुलै पोलिस प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनाचा मराठा समाजबांधवांनी रविवारी दि. २८ जुलै रोजी निषेध नोंदविला. यावेळी असोला येथे मराठा समाजबांधवांनी एकत्र येत घोषणाबाजी केली. मागण्या दि. ६ आॅगस्ट पर्यन्त तातडीने पूर्ण करा; अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
असोला ढोबळे येथे १८ जुलै रोजी सामाजिक वादातून मारोती पावडे यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेचा सर्वस्तरातून निषेध व्यक्त होत असून, सकल मराठा समाजबांधवांच्या वतीने मुख्यमंत्री, पोलिस अधीक्षक, विशेष पोलिस महानिरीक्षकांना निवेदन देवून या प्रकरणातील आरोपींवर मोक्कातंर्गत कारवाई करून दोन वर्षांसाठी तडीपार करावे, या प्रकरणातील सखोल चौकशी करून दोषीविरूद्ध कारवाई करावी, संबंधीत पोलिस अधिकाऱ्यांविरूद्ध निलंबनाची कारवाई करावी, क्राॅस गुन्हयातील खोट्या कलमा कमी कराव्यात, जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करावेत, यासह इतर मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणात कारवाईचे आश्वासनही पोलिस प्रशासनाने दिले आहे.
परंतु, २७ जुलै रोजी अचानक काहीजणांनी पोलिस प्रशासनाला निवेदन दिले. या निवेदनात असोलाचे गोळीबार प्रकरण वैयक्तीक कारणातून झाल्याचे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उलट न्याय मागणी करणारे सकल मराठा समाज जिल्हा हिंगोली च्या मराठा बांधवाना समाजकटक म्हटले, यामुळे निवेदनाचा असोला येथील समाजबांधवांकडून निषेध नोंदविण्यात येत असून, आत्तापर्यंत ‘हे’ निवेदनकर्ते कुठे गेले होते? असा सवालही उपस्थित केला आहे. पावडे यांच्यावरील गोळीबार सामाजिक वादातूनच झाल्याचे मराठा समाजबांधवांचे म्हणणे असून, याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींविरूद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
असोला येथे मराठा समाजबांधवांनी दिल्या घोषणा...
२७ जुलै रोजी काही जणांनी दिलेल्या निवेदनाचा निषेध नोंदविण्यासाठी असोला येथे २८ जुलै रोजी मराठा समाजबांधव एकत्र जमले होते. यावेळी गोळीबार प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींविरूद्ध कारवाई करावी, अशी मागणी करीत मराठा समाजबांधवांनी घोषणा देत गोळीबार प्रकरणाचा व निवेदनाचा निषेध नोंदविला. यावेळी शेकडो मराठा समाजबांधवांची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा