ग्राम बाल संरक्षण समितीचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे मार्गदर्शन
हिंगोली, दि. १२ सप्टेंबर २०२५ :
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय हिंगोली अंतर्गत कार्यरत जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने ‘मिशन वात्सल्य’ योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात ग्राम बाल संरक्षण समित्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणास जिल्हाधिकारी मा. राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली.
प्रशिक्षणात बोलताना मा. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी उपस्थित ग्राम बाल संरक्षण समित्यांना उद्देशून सांगितले की, “बालकांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी ग्रामस्तरावर सक्रिय सहभाग आवश्यक आहे. बालविवाह निर्मूलनासाठी सर्वांनी सजग राहून काम करावे. यासाठी जर कोणा सदस्याकडे नवकल्पना असतील, तर त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आपल्या कल्पना मांडाव्यात.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. संतोष दरपलवार यांनी करत प्रशिक्षणाचे उद्दिष्ट स्पष्ट केले.
प्रशिक्षणात विविध विषयांवर संबंधित तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले :
- विधी सल्लागार वर्षा पराते यांनी "कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायदा 2013" याविषयी माहिती दिली.
- जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे आणि सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा पठाण यांनी ग्राम बाल संरक्षण समितींची भूमिका, जबाबदाऱ्या व बाल संरक्षण यंत्रणेचे कार्य स्पष्ट केले.
- समुपदेशक सचिन पठाडे यांनी "बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012", बाल हक्क सुरक्षा अभियान, मुलांचे मूलभूत हक्क व जनजागृती यावर मार्गदर्शन केले.
- बाल संरक्षण अधिकारी (संस्था बाह्य) यांनी दत्तक विधान प्रक्रिया, कायदेशीर प्रक्रिया व पात्रतेबाबत माहिती दिली.
- कायदा व परीविक्षा अधिकारी ऍड. अनुराधा पंडित यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 अंतर्गत कायदेशीर बाबी आणि प्रतिबंधात्मक उपायांवर भाष्य केले.
- हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस उप निरीक्षक श्रीदेवी वगे याने कायदेविषयक मार्गदर्शन केले
- गणेश मोरे (बाल संरक्षण अधिकारी संस्थात्मक) यांनी "RTE – शिक्षणाचा अधिकार कायदा" याविषयी माहिती दिली.
- सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे यांनी महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. यामध्ये ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना’, ‘प्रतिपालकत्व योजना’, ‘अनाथ प्रमाणपत्र’, ‘बालगृह’, ‘निरीक्षण गृह’ यांचा समावेश होता.
- संदीप कोल्हे (चाईल्ड हेल्पलाइन 1098 प्रकल्प समन्वयक) यांनी तात्काळ सेवा व फोन रिस्पॉन्स सिस्टीमची माहिती दिली.
- तालुका संरक्षण अधिकारी जगदीश राठोड यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 यावर प्रकाश टाकला.
- सखी वन स्टॉप सेंटरचे दिनेश पाटील यांनी सखी सेंटरची कार्यपद्धती स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धाराशिव शिराळे यांनी तर आभार प्रदर्शन क्षेत्रबाह्य कार्यकर्ता अनिरुद्ध घनसावंत यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात कनिष्ठ लिपिक अमृता दुधारे, तालुका संरक्षण अधिकारी नितीश मकासरे, लेखापाल शितल भंडारे, माहिती विश्लेषक शेख रफिक, समुपदेशक अंकुर पातोडे, सुपरवायझर प्रिया पखाले, केस वर्कर राजरत्न पाईकराव, तथागत इंगळे, सुरज इंगळे यांचा मोलाचा सहभाग राहिला.
टिप्पणी पोस्ट करा