खोट्या गुन्ह्याच्या धमकीने धास्तावलेल्या रोजगार सेवकाची आत्महत्या उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन करून संपवले आयुष्य; चार जणांवर गुन्हा दाखल

खोट्या गुन्ह्याच्या धमकीने धास्तावलेल्या रोजगार सेवकाची आत्महत्या
उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन करून संपवले आयुष्य; चार जणांवर गुन्हा दाखल

.हिंगोली 
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
 दि. 22 सप्टेंबर 
सेनगाव तालुक्यातील सावरखेडा येथील रोजगार सेवकाने अॅट्रासिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी मिळाल्यामुळे मनस्तापातून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिसांनी चार आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

 घटनेचा तपशील
भागवत बळीराम मुंढे (वय 39) हे सावरखेडा येथील रोजगार सेवक म्हणून कार्यरत होते. दिनांक 14 सप्टेंबर रोजी त्यांच्याकडे घरकुल योजनेतील निधी आपल्या खात्यात जमा होत नसल्याच्या कारणावरून काही व्यक्तींनी वाद घालून शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना अॅट्रासिटीच्या खोट्या गुन्ह्याची धमकीही देण्यात आली.
या अपमानास्पद वागणुकीने त्रस्त होऊन आणि सामाजिक बदनामीच्या भीतीने भागवत मुंढे यांनी उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. प्रकृती खालावल्यानंतर त्यांना तातडीने हिंगोलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे स्थिती गंभीर झाल्यामुळे पुढील उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
 चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
मयताचे बंधू भारत बळीराम मुंढे यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलिस ठाण्यात खालील आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
दत्तराव कुंडलीक खंदारे
शेषराव लिंबाजी डाखोरे
सुभाष भागोराव डाखोरे
ज्ञानेश्वर आनंदराव नरवाडे
या प्रकरणातील चौघांनाही सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, पोलीस उपनिरीक्षक रविकिरण खंदारे, राजेश जाधव, तुकाराम मार्कड, टी. के. वंजारे, काशिनाथ शिंदे यांच्या पथकाने अटक केली आहे.

 गावात तणावाचे वातावरण
या धक्कादायक घटनेमुळे शनिवारी सावरखेडा गावात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तात्काळ फौजफाटा तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मृतदेहाचे शवविच्छेदन सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.

 कुटुंबाचा आक्रोश
भागवत मुंढे यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ आणि भावजय असा परिवार असून त्यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे

Post a Comment

أحدث أقدم