मी दक्ष" – सुरक्षित समाजासाठी हिंगोली पोलिसांचा उपक्रम, सहायक सरकारी वकील कार्यालयात साजरा


"मी दक्ष" – सुरक्षित समाजासाठी हिंगोली पोलिसांचा उपक्रम, सहायक सरकारी वकील कार्यालयात साजरा

हिंगोली | महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क | 16 ऑक्टोबर 2025
सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण आणि डिजिटल युगातील सुरक्षेची वाढती आव्हाने लक्षात घेऊन हिंगोली जिल्हा पोलीस दलाने "मी दक्ष – सुरक्षित समाज, आपली जबाबदारी" हा सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ हिंगोली जिल्हा न्यायालयातील सहायक सरकारी वकील कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.
या उपक्रमाचा प्रमुख हेतू म्हणजे नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे, ऑनलाईन फसवणुकीपासून संरक्षण मिळविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन देणे आणि स्वतःची तसेच कुटुंबाची डिजिटल सुरक्षा मजबूत करणे हा आहे.

> “मी दक्ष – माझ्या सुरक्षेसाठी, मी दक्ष – माझ्या कुटुंबासाठी, मी दक्ष – समाज आणि राष्ट्रासाठी.”
हा प्रेरणादायी संदेश समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी पोलिसांकडून गावागावात जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
पोलीस दलाची तयारी :
या मोहिमेसाठी हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शामकुमार डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचारी पूर्ण तत्परतेने कार्यरत आहेत.
गावागावात सायबर सुरक्षा कार्यशाळा, शाळा-महाविद्यालयांतील संवाद सत्रे, ग्रामसभा आणि जनजागृती रॅली आयोजित करण्याची तयारी सुरू आहे.
तसेच, सोशल मीडियाच्या माध्यमातून माहितीपर पोस्ट आणि जनजागृती संदेश प्रसारित करून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
वरिष्ठांचे मार्गदर्शन :
या उपक्रमामागे पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या प्रेरणेने संपूर्ण हिंगोली जिल्हा पोलीस दल या जनजागृती मोहिमेत सक्रियपणे सहभागी झाला आहे.

पोलीस निरीक्षक श्री. शामकुमार डोंगरे यांनी सांगितले की 
> “सायबर गुन्हे हे आजच्या काळातील सर्वात मोठे आव्हान आहे. नागरिकांनी जागरूक राहणे हीच सर्वात प्रभावी संरक्षणाची उपाययोजना आहे. म्हणूनच ‘मी दक्ष’ हा उपक्रम प्रत्येक गावात राबविण्याचा आमचा संकल्प आहे. नागरिकांनी यात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, हीच अपेक्षा.”

कार्यक्रमातील उपस्थिती 
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सहायक सरकारी वकील श्री. अनिल इंगळे यांनी भूषविले.
कार्यक्रमाला सरकारी वकील निखिल चंदेल, शारदा भट, गजानन जगताप, ज्ञानेश्वर एस. भारती, श्रीकृष्ण राठोड, सबा फरहिन हमीदुल्ला खान, दिपाली शिरफुले आणि रमेश जाधव हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शामकुमार डोंगरे यांनी उपस्थित वकीलांना "मी दक्ष" उपक्रमाचे महत्त्व, सायबर गुन्ह्यांची वाढती प्रकरणे, प्रतिबंधक उपाय आणि नागरिकांनी घ्यावयाची दक्षता याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी सरकारी वकील श्री. अनिल इंगळे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिवाळीच्या आगाऊ शुभेच्छा देत या उपक्रमाचे कौतुक केले.

तसेच कार्यक्रमाला हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक श्री. राहुल घुले, श्रीदेवी वघे तसेच पोलीस  संतोष वाटोरे सुधीर ठोंबरे .गारवे  उपस्थित होत
‘मी दक्ष’ हा उपक्रम केवळ सायबर सुरक्षेपुरता मर्यादित नसून, सुरक्षित समाज आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना दृढ करणारी सामाजिक चळवळ ठरत आहे.
हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनच्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण होऊन सुरक्षित डिजिटल समाज निर्मितीला निश्चितच चालना  मिळेल

Post a Comment

أحدث أقدم