हिंगोलीत महिला वाहतूक पोलिसावर हल्ला शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

 हिंगोलीत महिला वाहतूक पोलिसावर हल्ला
  दोघांवर गुन्हा दाखल

हिंगोली, दि. 20 ऑक्टोबर 
(महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क):
हिंगोली शहरातील इंदिरा गांधी चौक येथे वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलिसावर दोन व्यक्तींनी शिवीगाळ करून झटापट केल्याची घटना घडली आहे. या घटनेत महिला पोलिसाला बोचकारून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे दोघांविरुद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळी सणानिमित्त हिंगोली शहरात खरेदीसाठी मोठी गर्दी होत असल्याने शहरातील प्रमुख चौकांवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शनिवारी (दि. १८ ऑक्टोबर) संध्याकाळी शहर वाहतूक शाखेतील महिला पोलिस शिल्पा चंद्रकांत फटाले या इंदिरा गांधी चौकात ड्युटीवर होत्या.
दरम्यान, लिंबाळा मक्ता येथील सचिन जिलान्या पवार आणि ज्योती संजय काळे हे दोघे तेथे आले असता त्यांनी ड्युटीवर असलेल्या फटाले यांच्याशी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. याबाबत पोलिस कर्मचारी फटाले यांनी जाब विचारल्यावर आरोपी ज्योती काळे हिने त्यांच्यासोबत झटापट केली व चेहऱ्यावर हाताने बोचकारले. त्याचबरोबर दोघांनीही फटाले यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकारामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याने हिंगोली शहर पोलिस ठाण्यात सचिन पवार व ज्योती काळे यांच्याविरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम 353, 332, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदिप मोदे, पोलिस उपनिरीक्षक राहुल महिपाळे, तसेच जमादार अशोक धामणे, संजय मार्के, गणेश लेकुळे, शेख मुजीब व गणेश करे यांच्या पथकाकडून सुरू आहे.
 
सणासुदीच्या दिवसांत शहरात वाढलेल्या गर्दीमुळे वाहतूक पोलिसांना अधिक ताणाखाली काम करावे लागत आहे. अशा परिस्थितीत ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला होणे ही गंभीर बाब असून, पोलिस प्रशासनाने अशा प्रकारच्या घटनांकडे गांभीर्याने पाहत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने