पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दागिने घेऊन चोरटे पसार

पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दागिने घेऊन चोरटे पसार

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क | 27 ऑक्टोबर | हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल १५ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना २५ ऑक्टोबरच्या रात्री उघडकीस आली. चोरी केल्यानंतर पळून जाणाऱ्या चोरट्यांच्या कारचा पोलिसांनी थरारक पद्धतीने पाठलाग केला, मात्र चोरटे कार जागेवर सोडून पसार होण्यात यशस्वी झाले.

घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरी
मिळालेल्या माहितीनुसार, जवळा बाजार येथील महेंद्र महावीर वायकोश हे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपल्या कुटुंबासह मूळ गावी पूरजळ येथे गेले होते. घर बंद असल्याची माहिती मिळाल्यानंतर चोरट्यांनी २५ ऑक्टोबरच्या रात्री घराचा कडीकोयंडा तोडून सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले.

सिनेस्टाईल पोलिस पाठलाग

दरम्यान, औंढा नागनाथ पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्या रात्री विशेष कोंबिंग ऑपरेशन आणि वाहन तपासणी सुरू होती. पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे, सहायक पोलिस निरीक्षक कैलास भगत, उपनिरीक्षक माधव जिव्हारे, तसेच जमादार इम्रान सिद्दिकी, राजेश ठाकूर, राम गडदे आणि अंबादास बेले यांचे पथक या तपासणीसाठी तैनात होते.

याच दरम्यान भरधाव वेगात येणाऱ्या एका कारने पोलिसांना पाहताच दिशा बदलून नागेशवाडी मार्गे वसमत रस्त्याने पळ काढला. संशय बळावल्याने पोलिस पथकाने तात्काळ त्या कारचा पाठलाग सुरू केला आणि शेजारील कुरुंदा व वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यांनाही कळवले. दोन्ही ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेट्स उभारून कार थांबविण्याचा प्रयत्न केला.

मात्र, परिस्थिती चोरट्यांच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने त्यांनी कार जागेवर सोडून अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यश मिळवले.

चार नंबरप्लेटसह संशयास्पद कार जप्त

पोलिसांनी ती कार ताब्यात घेतली असता, तपासात कारमध्ये चार वेगवेगळ्या नंबरप्लेट्स आढळून आल्या. यावरून चोरट्यांनी ओळख लपविण्यासाठी विविध वाहन क्रमांकांचा वापर केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

पुढील तपास सुरू

या घटनेनंतर औंढा नागनाथ पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
संपूर्ण घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हिंगोली परिसरात गेल्या काही महिन्यांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या चोरीनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने