नामदेव केंद्रे यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा प्रभारी पदभार
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली 14 नोव्हेंबर
हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांच्याकडे आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा प्रभारी पदभार सोपविण्यात आला आहे. विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश या वैयक्तिक कारणास्तव महिनाभराच्या रजेवर गेल्याने ही अतिरिक्त जबाबदारी केंद्रे यांना देण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे कामकाज सांभाळताना प्रकल्प संचालक म्हणून देखील जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार असल्याने केंद्रे यांच्या ‘’ . दोन्ही पदांवरील दैनंदिन कामकाज, विकास योजनांचे मार्गदर्शन, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आणि विविध विभागांशी समन्वय अशी दुहेरी धुरा त्यांना सांभाळावी लागणार आहे.
यापूर्वीही नामदेव केंद्रे यांनी जिल्हा प्रशासनातील अनेक महत्त्वाच्या पदांचा कार्यभार यशस्वीरीत्या सांभाळला आहे. त्यांनी प्रकल्प संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी या तीन महत्त्वपूर्ण विभागांची जबाबदारी एकाचवेळी पार पाडली होती. त्यामुळे बहुभूमिका निभावण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे.
नवीन पदभार स्वीकारल्यानंतर केंद्रे यांनी आजच प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनातील कामकाज सुरळीत राहावे आणि नागरिकांना कोणत्याही सेवेत अडथळा येऊ नये, यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकही घेतल्याचे समजते.
हिंगोली जिल्हा परिषदेच्या कामकाजात या बदलामुळे काही प्रमाणात तात्पुरता समन्वयाचा ताण निर्माण होणार असला तरी नामदेव केंद्रे यांच्या अनुभवामुळे प्रशासन प्रभावीपणे चालेल, असा विश्वास जिल्हा परिषदेतील अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.
إرسال تعليق