हिंगोली बस स्थानकात बसखाली येऊन एकाचा दुर्दैवी मृत्यू
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
28 डिसेंबर 2025
हिंगोली शहरातील बस स्थानक परिसरात आज सायंकाळी सुमारे ६ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास एक दुर्दैवी अपघात घडला. बसखाली येऊन राजेश ओमप्रकाश अग्रवाल (वय ५५, रा. नरसी नामदेव, ता. व जि. हिंगोली) यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कंधार–हिंगोली मार्गावरून रिसोडकडे जाणारी एसटी बस क्रमांक MH 20.1655 हिंगोली बस स्थानकात येत असताना हा अपघात झाला. बस स्थानक परिसरात वर्दळ सुरू असतानाच राजेश अग्रवाल हे अपघातात बसखाली आल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदतीचा प्रयत्न केला; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
घटनेची माहिती मिळताच हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद बनसोडे, पोलीस हवालदार मोहम्मद शेख, पोलीस नाईक कोरडे, पोलीस कॉन्स्टेबल संजय मस्के तसेच पोलीस हवालदार मार्के यांनी घटनास्थळी पंचनामा करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
या घटनेमुळे काही काळ बस स्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती शांत ठेवत वाहतूक सुरळीत केली. घटनेबाबत पुढील तपास हिंगोली शहर पोलीस करीत आहेत.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, मयताच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
टिप्पणी पोस्ट करा