माझ्या गर्लफ्रेंडशी का बोलतोस? या कारणावरून युवकावर चाकू हल्ला
तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपी फरार
महाराष्ट्र 24 न्यूज | 3 जानेवारी 2026
वसमत (जि. हिंगोली):
तू माझ्या गर्लफ्रेंडशी का बोलतोस, या कारणावरून महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्यावर तिघा युवकांनी चाकू हल्ला केल्याची गंभीर घटना वसमत तालुक्यातील हट्टा गावाजवळ शनिवारी (दि. 3) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील वारंगा येथील वैभव क्षीरसागर हा विद्यार्थी वसमत तालुक्यातील फाटा येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. शनिवारी दुपारी महाविद्यालयातील वर्ग आटोपून तो सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास आपल्या खोलीकडे जात असताना हट्टा गावाजवळ दुचाकीवरून आलेल्या तिघा युवकांनी त्याचा रस्ता अडवला.
यावेळी आरोपींनी अचानक वैभववर चाकूने हल्ला चढविला. अनपेक्षित हल्ल्यामुळे वैभव घाबरून गेला. आरोपींनी त्याच्यावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर घटनास्थळी चाकू फेकून देत आरोपी दुचाकीवरून परभणीच्या दिशेने फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी वैभव क्षीरसागर यास त्वरित रुग्णवाहिकेद्वारे परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी कार्तिक जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून हट्टा पोलीस ठाण्यात आरोपी महेश ढोरे व त्याचे दोन साथीदार यांच्याविरुद्ध चाकू हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत नमूद केल्यानुसार, “तू माझ्या गर्लफ्रेंडशी का बोलतोस,” या कारणावरून आरोपींनी वैभव क्षीरसागर याच्यावर जीवघेणा हल्ला केला.
घटनेनंतर तिन्ही आरोपी फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी हट्टा पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. आरोपींना अटक झाल्यानंतरच या घटनेमागील नेमकी पार्श्वभूमी स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेमुळे हट्टा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा