पोलीस स्थापना दिनानिमित्त ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये सत्कार समारंभ संपन्न
हिंगोली | प्रतिनिधी
2 जानेवारी 2026
पोलीस स्थापना दिनानिमित्त ग्रामीण पोलीस स्टेशन येथे एका भव्य व उत्साहपूर्ण सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरकारी वकील श्री. अनिल इंगळे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम विकास अधिकारी श्री. विलास मोरे यांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे आयोजन वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी भाकरे यांच्या पुढाकारातून करण्यात आले.
या समारंभात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. पोलीस निरीक्षक श्री. शामकुमार डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक श्री. राहुल घुले व श्रीदेवी वगे यांना पोलीस स्थापना दिनानिमित्त “हॅप्पी मॅन” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी श्री. शामकुमार डोंगरे यांनी आपल्या सेवाकाळातील अनुभव मांडत नागरिक व पोलिसांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्याचे आवाहन केले.
यावेळी महाराष्ट्र 24 न्यूजचे मुख्य संपादक श्री. सुधाकर वाढवे यांनी पोलिसांच्या कार्यावर सविस्तर भाष्य केले. त्यांनी पोलिसांची समाजातील भूमिका, कायदा व सुव्यवस्था राखताना येणाऱ्या अडचणी आणि जनतेच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे योगदान यावर प्रकाश टाकला. तसेच अध्यक्षीय भाषणात सरकारी वकील श्री. अनिल इंगळे यांनी पोलिसांचे कर्तव्य, जबाबदाऱ्या व समाजातील त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमास सरकारी वकील जाधव, पत्रकार गजानन पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन पत्रकार श्री. सुधाकर वाढवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक श्री. राहुल घुले यांनी मानले.
संपूर्ण कार्यक्रमात पोलिसांच्या सेवाभावाला सलाम करण्यात आला असून, पोलीस व नागरिक यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा