हिंगोलीत जीएसटी कार्यालयाजवळ लाचखोर कर सहाय्यक रंगेहात जेरबंद – २० हजारांची लाच स्वीकारताना सापळा यशस्वी

हिंगोलीत जीएसटी कार्यालयाजवळ लाचखोर कर सहाय्यक रंगेहात जेरबंद – २० हजारांची लाच स्वीकारताना सापळा यशस्वी

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
1 जानेवारी 2026 
हिंगोली येथील वस्तू व सेवा कर (GST) विभागातील कर सहाय्यकाने प्रोफेशनल टॅक्सची नोटीस रद्द करून रक्कम ॲडजस्ट करण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ला.प्र.वि.) यशस्वी सापळा रचत आरोपीला रंगेहात पकडले आहे. सदर कारवाईमुळे शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.
तक्रारदाराचे सेनगाव येथे ‘पाटील कृषी सेवा केंद्र अँड मशिनरी’ नावाचे दुकान असून व्यवसायासाठी जीएसटी क्रमांक मिळवण्यासाठी त्यांनी ८ सप्टेंबर २०२५ रोजी ऑनलाइन अर्ज केला होता. त्यानंतर १० ऑक्टोबर २०२५ रोजी प्रोफेशनल टॅक्स कार्यालयाकडून १९ डिसेंबर २०१७ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीतील प्रोफेशनल टॅक्स, व्याज व दंड मिळून एकूण ४३,९०४ रुपये भरण्याची नोटीस देण्यात आली होती.
दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी कर सहाय्यक उमेश साहेबराव सरकटे (वय ३३) हे तक्रारदारांच्या दुकानावर आले. तक्रारदार बाहेरगावी असल्याने फोनवर संभाषण झाले. त्यानंतर ३० डिसेंबर २०२५ रोजी सरकटे यांनी तक्रारदारास फोन करून, नोटीस कॅन्सल करून रक्कम न भरता ॲडजस्टमेंट करून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितली.
या बाबत तक्रारदाराने तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, हिंगोली येथे तक्रार दाखल केली. दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असता आरोपीने स्वतःसाठी व वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. तडजोडीअंती ही रक्कम २० हजार रुपये ठरवण्यात आली.
यानंतर दि. १ जानेवारी २०२६ रोजी हिंगोली येथील वस्तू व सेवा कर कार्यालयाजवळ, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मुख्य गेटसमोर रोडवर सापळा रचण्यात आला. पंच साक्षीदारांच्या समक्ष तक्रारदाराकडून २० हजार रुपये लाच स्वीकारताना आरोपी उमेश सरकटे यास रंगेहात पकडण्यात आले.
आरोपीच्या अंगझडतीत २,९५० रुपये रोख, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, कार्यालयीन ओळखपत्र, पिवळ्या धातूची अंगठी व वनप्लस कंपनीचा मोबाईल आढळून आला. मोबाईलची तपासणी सुरू असून आवश्यकतेनुसार जप्ती करण्यात येणार आहे.
आरोपीचे राहते घर रिसोड (जि. वाशिम) येथे असून घरझडतीबाबत वाशिम येथील ला.प्र.वि. अधिकाऱ्यांना ठराव देण्यात आला आहे.
या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया  असून आरोपीस अटक करण्यात येणार आहे.
या कारवाईत तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक राजेश मलपिलु यांनी काम पाहिले असून, संपूर्ण सापळा कारवाईचे नेतृत्व पोलीस उपअधीक्षक विकास घनवट (ला.प्र.वि., हिंगोली) यांनी केले.
लाचखोरीविरोधातील या धडक कारवाईमुळे शासकीय कार्यालयातील भ्रष्ट प्रवृत्तीवर मोठा आघात झाला असून, नागरिकांनी निर्भयपणे तक्रार करण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे.
 कारवाई मध्ये 
ASI विजय शुक्ला पोह/ भगवान मंडलिक, राजाराम फुपाटे, गजानन पवार, रवींद्र वरणे, गोविंद पो.शी. पुंडगे, जाधव चापोह शेख अकबर यांनी सहभाग घेतला होता 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने