शेत आखाड्यावरील मर्डरचा अवघ्या दोन तासांत छडा; सख्खा भाऊच निघाला मारेकरी हिंगोली पोलिसांची उत्कृष्ट व जलद कार्यवाही

शेत आखाड्यावरील मर्डरचा अवघ्या दोन तासांत छडा; सख्खा भाऊच निघाला मारेकरी
हिंगोली पोलिसांची उत्कृष्ट व जलद कार्यवाही

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
15 जानेवारी 2026 
हिंगोली जिल्ह्यातील हट्टा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे रांजना येथे शेत आखाड्यावर झालेल्या खुनाचा अवघ्या दोन तासांत उलगडा करत हिंगोली पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या घटनेत मयताचा सख्खा भाऊच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपी सख्खा भाऊ 
दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी पहाटे हट्टा पोलीस ठाण्यास माहिती मिळाली की मौजे रांजना येथील शेतकरी नामदेव सावळे यांच्या शेत आखाड्यावर त्यांचा मुलगा नामे उर्फ नवनाथ नामदेव साळवे (वय २५ वर्षे) याचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात जबर मार करून खून केला आहे. सदर माहिती मिळताच हट्टा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सपोनि श्री. संग्राम जाधव यांनी तात्काळ ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली.
या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक श्री. नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजकुमार केंद्रे, पोलीस निरीक्षक श्री. मोहन भोसले तसेच स्थानिक गुन्हे शाखेची पथके यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली. यावेळी श्वान पथक, फॉरेन्सिक तज्ज्ञ व फिंगरप्रिंट पथक यांनाही पाचारण करण्यात आले.
प्रथमदर्शनी सदर खून कोणी केला याबाबत कोणताही ठोस सुगावा मिळत नव्हता. मात्र पोलिसांनी अत्यंत बारकाईने घटनास्थळाची पाहणी केली असता आडोशाला रक्ताने माखलेली कुऱ्हाड आढळून आली. तसेच गावातून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मयत नवनाथ साळवे व त्याचा लहान भाऊ गजानन नामदेव साळवे (वय २३ वर्षे) यांच्यात घरगुती कामकाज व शेतीच्या कारणावरून नेहमी वाद होत असल्याचे समोर आले.
घटनास्थळी उपस्थित असलेला गजानन हा पोलिसांच्या संशयापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असला तरी त्याचे संशयास्पद वर्तन पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र अधिक विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर त्याने मध्यरात्री शेतीतील कामाच्या व घरगुती वादातून आपल्या मोठ्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून खून केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपी गजानन नामदेव साळवे (रा. रांजना) यास ताब्यात घेतले असून पुढील तपास ठाणेदार श्री. संग्राम जाधव हे करीत आहेत.
ही संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजकुमार केंद्रे (वसमत), पोलीस निरीक्षक श्री. मोहन भोसले (स्थागुशा हिंगोली) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत सपोनि श्री. शिवसांब घेवारे, पोउपनि श्री. माधव जिव्हारे, पोउपनि श्री. संजय केंद्रे तसेच पोलीस अंमलदार हकीम शेख, संदीप सुरुसे, प्रीतम चव्हाण, गणेश सूर्यवंशी यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली

Post a Comment

أحدث أقدم