जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची धडक कारवाईडिग्रस फाट्यावर अवैध रेतीचा टिप्पर पकडला, जिल्ह्यात खळबळ

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची धडक कारवाई
डिग्रस फाट्यावर अवैध रेतीचा टिप्पर पकडला, जिल्ह्यात खळबळ

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
17 जानेवारी 2026
हिंगोली : जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या कारवाईला आणखी धार देत शुक्रवारी थेट जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनीच अवैध रेतीने भरलेला टिप्पर पकडल्याची घटना घडली. या धडक कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात पोलीस व महसूल प्रशासनाच्या संयुक्त पथकांकडून अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात सातत्याने मोहिम राबविली जात आहे. या मोहिमेत आतापर्यंत अनेक टिप्पर व ट्रॅक्टर जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशातच १६ जानेवारी रोजी हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावरून जात असताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या निदर्शनास डिग्रस फाट्याजवळून जाणारा एक टिप्पर संशयास्पद अवस्थेत आढळून आला.
जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ सदर टिप्पर थांबवून चालकाकडे रेती वाहतुकीचा परवाना व कागदपत्रांची चौकशी केली. मात्र चालकाकडे कोणताही वैध परवाना अथवा अधिकृत कागदपत्रे सादर करता आली नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश देत अवैध रेतीने भरलेला टिप्पर (क्र. एमएच ३८ एक्स ५०२२) जप्त केला.
हा टिप्पर पुढील कार्यवाहीसाठी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात लावण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
जिल्हाधिकारी स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई करत असल्याने अवैध रेती व्यावसायिकांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली असून, प्रशासन कोणालाही पाठीशी घालणार नाही, असा ठाम संदेश या कारवाईतून दिला गेला आहे. आगामी काळात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात आणखी कठोर पावले उचलली जाणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

Post a Comment

أحدث أقدم