पदोन्नतीसाठी 12 हजारांची लाच स्वीकारताना वरिष्ठ पलटण नायक रंगेहाथ अटक; तिघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
23 फेब्रुवारी 2026
परभणी
जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय, परभणी येथील पदोन्नतीप्रकरणी 12 हजार रुपयांची लाच स्वीकारताना वरिष्ठ पलटण नायकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ला.प्र.वि.) रंगेहाथ पकडले. या कारवाईत केंद्र नायक व प्रशासकीय अधिकाऱ्यासह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ला.प्र.वि. घटक परभणी यांना दि. 20 फेब्रुवारी 2026 रोजी एका 37 वर्षीय पुरुष तक्रारदाराने लेखी तक्रार दिली. तक्रारदारास दि. 31 डिसेंबर 2025 रोजी पलटण नायक पदाची पदोन्नती देण्यात आली होती. मात्र, या पदोन्नतीसाठी “बक्षीस” म्हणून 25 हजार रुपयांची मागणी करण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली.
तक्रारीनुसार, जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयातील केंद्र नायक नानासाहेब गणपतराव मोखडे, प्रशासकीय अधिकारी माणिक शंकरराव वाडेकर आणि वरिष्ठ पलटण नायक ज्ञानोबा बाबुराव लटपटे यांनी एकत्रितपणे 25,000 रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी 8,000 रुपये तक्रारदाराकडून फोन-पे द्वारे वरिष्ठ पलटण नायक लटपटे यांनी यापूर्वी स्वीकारल्याचे समोर आले. उर्वरित 17,000 रुपयांची मागणी सुरूच होती.
जगदंबा हॉटेलमध्ये पडताळणी
दि. 20 फेब्रुवारी रोजी जिंतूर रोडवरील जगदंबा हॉटेल येथे लाच मागणी पडताळणी करण्यात आली. त्यावेळी सुरुवातीस 25 हजारांची मागणी केल्याचे मान्य करण्यात आले. चर्चेनंतर तडजोडीअंती 12 हजार रुपयांवर सौदा ठरवण्यात आला व सदर रक्कम वरिष्ठ पलटण नायक लटपटे यांच्याकडे देण्याचे सांगण्यात आले.
हॉटेल रायबा येथे सापळा यशस्वी
दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी हॉटेल रायबा, जिंतूर रोड, परभणी येथे शासकीय पंचासमक्ष सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून 12,000 रुपये स्वीकारताना वरिष्ठ पलटण नायक ज्ञानोबा लटपटे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
अंगझडतीत मोबाईल व रोख रक्कम जप्त
कारवाईदरम्यान तिन्ही आरोपींची अंगझडती घेण्यात आली.
नानासाहेब मोखडे यांच्याकडून विवो कंपनीचा मोबाईल व 200 रुपये रोख
माणिक वाडेकर यांच्याकडून रेडमी मोबाईल व 4,555 रुपये रोख
ज्ञानोबा लटपटे यांच्याकडून विवो मोबाईल व 100 रुपये रोख
मोबाईल हँडसेटची तपासणी करून आवश्यकता असल्यास जप्तीची कार्यवाही करण्यात येणार आहे. आरोपींच्या घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे.
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा
पोलीस स्टेशन नानलपेठ, परभणी येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 च्या कलम 7 अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची कार्यवाही करण्यात येणार आहे.
ही सापळा कारवाई पोलीस निरीक्षक श्री. अल्ताफ मुलाणी (ला.प्र.वि., परभणी) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईचे पर्यवेक्षण व पुढील तपास पोलीस उपअधीक्षक श्री. राहुल तरकसे (ला.प्र.वि., परभणी) करीत आहेत.
ला.प्र.वि.कडून नागरिकांना आवाहन:
शासकीय कामासाठी कोणीही लाच मागितल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा