आयुका), पुणे येथे विज्ञान वारीसाठी हिंगोली जिल्हा परिषदेचे ४६ विद्यार्थी रवाना
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दाखवली हिरवी झेंडी
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली, दि. 27 फेब्रुवारी
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त २८ फेब्रुवारी रोजी हिंगोली जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सातवी इयत्तेतील एकूण ४६ विद्यार्थी ‘विज्ञान वारी’ उपक्रमांतर्गत पुणे येथील Inter-University Centre for Astronomy and Astrophysics (आयुका) येथे रवाना झाले. जिल्हाधिकारी गुप्ता यांनी हिरवी झेंडी दाखवून विद्यार्थ्यांच्या पथकाला शुभेच्छांसह रवाना केले.
हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून आठ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि संशोधन क्षेत्राची ओळख व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
हा उपक्रम माजी खासदार हेमंत पाटील तथा हळद संशोधन केंद्राचे मंत्री दर्जा अध्यक्ष यांच्या पुढाकारातून दरवर्षी राबविण्यात येतो. त्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना पुणे येथे प्रत्यक्ष शास्त्रज्ञांच्या सान्निध्यात विज्ञान अभ्यासाची संधी उपलब्ध करून दिली जाते.
आयुका येथे विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र, अवकाश संशोधन, विविध वैज्ञानिक प्रयोग व अत्याधुनिक प्रयोगशाळांची माहिती दिली जाणार आहे. तसेच तज्ज्ञ शास्त्रज्ञांकडून विविध वैज्ञानिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग पाहण्याची व समजून घेण्याची संधी मिळणार आहे.
यावेळी जिल्हा परिषद प्रकल्प अधिकारी नामदेव केंद्रे, गटशिक्षणाधिकारी दत्ता नांदे, केंद्रप्रमुख रेखा सुगंधे, पांडुरंग शिंदे, शिक्षक दत्ता पडोळे, नितीन मोरे, सुभाष पडोळे, चंद्रकांत कावरखे, विठ्ठल गवळी, माधव पोळे, श्याम राऊत, दत्तराव शिंदे साईनाथ पाटील अनंत कलकुटे शंकर लेकुळे प्रकाश घ्यार गजानन गडदे बालाजी टोंचर गंगाप्रसाद शेटे, धम्मानंद धुळे, बंडू गुंजकर, सदाशिव कोरडे यांच्यासह पालक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या या विज्ञान वारीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी कुतूहल वाढण्यास चालना मिळणार असून भविष्यात संशोधन क्षेत्राकडे वळण्यासाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा