एटीएसकडून अटक झालेल्या माध्यमिक शिक्षकाला अखेर बडतर्फ
जि.प. सीईओ विवेक गायकवाड यांचे आदेश; विभागीय चौकशीअंती कारवाई
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली, दि. 17 फेब्रुवारी 2026
दहशतवादी हालचालीच्या संशयावरून २०१६ मध्ये मुंबईच्या काळाचौकी पोलिसांनी अटक केलेल्या हिंगोली जिल्हा परिषद बहुविध प्रशालेतील माध्यमिक शिक्षकाला अखेर सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी याबाबत सोमवारी अधिकृत आदेश जारी केले.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद रईसोद्दिन हे सन २००३ पासून हिंगोली जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. ८ ऑगस्ट २०१६ रोजी दहशतवादी हालचालीच्या संशयावरून मुंबईच्या काळाचौकी पोलिसांनी त्यांना हिंगोली शहरातून अटक केली होती. त्यानंतर संबंधित प्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्या अटकेची माहिती दहशतवाद विरोधी पथकाकडून जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आली होती.
या घटनेनंतर प्रशासनाने तात्काळ कारवाई करत ८ ऑगस्ट २०१६ रोजी संबंधित शिक्षकास निलंबित केले होते. पुढे २२ फेब्रुवारी २०२१ रोजी विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले. गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने तसेच संबंधित बाबींची माहिती प्रशासनास न दिल्याचा ठपका ठेवत चौकशी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन झाल्याचाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
विभागीय चौकशीदरम्यान प्रशासनाने मोहम्मद रईसोद्दिन यांच्याकडून खुलासा मागविला होता. त्यांनी अटकेनंतरच्या घटनाक्रमासंदर्भात आपला लेखी खुलासा सादर केला होता. त्यानंतर ८ ऑगस्ट २०२४ रोजी अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या नोटीसलाही त्यांनी जिल्हा परिषद बहुविध प्रशालेमार्फत उत्तर सादर केले होते.
दरम्यान, विभागीय चौकशीतील निष्कर्ष, दोषारोप तसेच पुढील कारवाईचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्याकडे सादर केला. चौकशी अहवालातील आरोपांचे गांभीर्य लक्षात घेऊन सीईओ विवेक गायकवाड यांनी संबंधित शिक्षकाला जिल्हा परिषद सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत.
या कारवाईमुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली असून, प्रशासनाने शिस्त व संस्थेची प्रतिमा अबाधित ठेवण्यासाठी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
إرسال تعليق