कॅमेरे बंद करून शिक्षकाने विद्यार्थ्यांना दिली कॉपी
वसमत येथील केंब्रिज कॉलेजमधील धक्कादायक प्रकार; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
18 फेब्रुवारी 2026
वसमत, बारावीच्या परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमेरे जाणीवपूर्वक बंद करून विद्यार्थ्यांना गाइडमधील उत्तरे सांगितल्याचा धक्कादायक प्रकार वसमत शहरातील केंब्रिज कॉलेजमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी अज्ञात शिक्षकाविरुद्ध वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
११ फेब्रुवारी रोजी हिंदी विषयाचा पेपर सुरू असताना दुपारी १२.३६ ते १.१३ या कालावधीत संबंधित शिक्षकाने परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना गाइडमधील उत्तरे वाचून दाखवत कॉपी करण्यास प्रत्यक्ष मदत केल्याचा आरोप आहे. या गैरप्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागाने तातडीने दखल घेत चौकशी सुरू केली.
शिक्षण विभागाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे
या घटनेबाबत गटशिक्षणाधिकारी सतीश कास्टे यांनी सविस्तर अहवाल तयार करून जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे पुढील कारवाईसाठी पाठविला आहे. परीक्षा मंडळाच्या नियमांनुसार परीक्षा पारदर्शक आणि निर्भेळ वातावरणात घेणे बंधनकारक आहे. गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.
केंद्र संचालकांची फिर्याद; पोलिस तपास सुरू
केंद्र संचालक गुलाबराव रामराव नलगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १६ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता संबंधित शिक्षकाविरुद्ध अनुचित मार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सुधीर वाघ करीत आहेत.
परीक्षेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या परीक्षांमध्येच गैरप्रकार होत असल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. संबंधित शिक्षकावर कोणती प्रशासकीय व कायदेशीर कारवाई होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
إرسال تعليق