हिंगोली जिल्ह्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर सरपंचांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती

हिंगोली जिल्ह्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर सरपंचांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
हिंगोली, दि. २२ (प्रतिनिधी) – जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात मुदत संपणाऱ्या ४९५ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्याची अधिसूचना ग्रामविकास विभागाने २० फेब्रुवारी रोजी जारी केली आहे. त्यामुळे यापूर्वी प्रशासनाकडून नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांऐवजी आता संबंधित ग्रामपंचायतींचे विद्यमान सरपंचच प्रशासक म्हणून कारभार पाहणार आहेत.
जिल्ह्यातील मोठ्या संख्येने ग्रामपंचायतींची पाच वर्षांची मुदत संपत असल्याने निवडणुका होईपर्यंत कारभार सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने काही ठिकाणी प्रशासकांची नियुक्ती केली होती. मात्र या नियुक्तीबाबत विविध स्तरांवर संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने स्पष्ट आदेश जारी करून मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
प्रशासकीय मंडळ स्थापन करण्याचे निर्देश
अधिसूचनेनुसार, संबंधित ग्रामपंचायतींमध्ये सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांचे प्रशासकीय मंडळ स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या मंडळामार्फत दैनंदिन कामकाज, विकासकामे, आर्थिक व्यवहार आणि विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. निवडणुका पार पडून नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात येईपर्यंत ही तात्पुरती व्यवस्था लागू राहणार आहे.
यापूर्वी कोरोनाकाळातही झाला होता निर्णय
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय यापूर्वी २०२० मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला होता. त्या वेळी निवडणुका घेणे शक्य नसल्यामुळे ग्रामविकास विभागाने विद्यमान सरपंच आणि सदस्यांना प्रशासक म्हणून कामकाज चालू ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याच धर्तीवर निर्णय घेण्यात आल्याने ग्रामीण भागातील प्रशासनात सातत्य राखले जाणार आहे.

Post a Comment

أحدث أقدم