हिंगोलीत घरफोडीची मोठी घटना; 13 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल लंपास
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
21 मार्च 2026
हिंगोली शहरातील अंबिका नगर परिसरात घरफोडीची गंभीर घटना घडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 13 लाख रुपयांहून अधिक किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गजानन भिमराव देवकर (वय 46, रा. पांगरा तर्फे लाख, ता. औंढा नागनाथ, सध्या रा. अंबिका नगर, हिंगोली) यांनी तक्रार दिली आहे. दिनांक 20 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7 वाजेपासून ते 21 मार्च 2026 रोजी सकाळी 7.30 वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात आरोपीने त्यांच्या भावाच्या राहत्या घराची कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला.
चोरट्यांनी घरातील विविध सोन्याचे दागिने, ज्यामध्ये चैन, मंगळसूत्र, नेकलेस, कानातील दागिने, अंगठ्या आदींचा समावेश असून त्यांचे एकूण वजन सुमारे 113.199 ग्रॅम आहे. या दागिन्यांची अंदाजे किंमत 8.59 लाख रुपये आहे. याशिवाय 2 लाख रुपयांची रोख रक्कमही लंपास करण्यात आली.
तसेच, त्याच घरातील किरायदार दिलीपराव मुकुंदराव देशमुख यांच्या मालकीचे सुमारे 38.88 ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत अंदाजे 2.15 लाख रुपये), 59.1 ग्रॅम चांदीचे दागिने (किंमत अंदाजे 4 हजार रुपये) व 42 हजार रुपये रोख रक्कम देखील चोरीस गेली आहे.
अशा प्रकारे या घरफोडीत एकूण 1,321,039.47 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 305 व 331 (4) अन्वये गुन्हा क्रमांक 188/2026 नोंदविण्यात आला आहे. अद्याप आरोपींची ओळख पटलेली नसून अटक करण्यात आलेली नाही.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी, कुंदन कुमार वाघमारे पोलीस निरीक्षक संदीप मोदे यांनी भेट देऊन पाहणी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे सह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय मार्के करीत आहेत.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलीसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
إرسال تعليق