अकोल्यात पोलिस अधिकाऱ्याची लज्जास्पद कृत्ये – पीडित महिलेकडून शरीरसुखाची मागणी, Asi राजेश जाधव तडकाफडकी निलंबित
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
1 एप्रिल 2026
अकोला : शहरातील पोलीस दलात मोठी खळबळ उडवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पीडित महिलेकडून शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक (ASI) राजेश जाधव यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित महिला एका प्रकरणात अटक होती . त्यावेळी ASI जाधव यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत महिलेशी अत्यंत अश्लील व अमानवी वर्तन केले. “तुझी मुलगी माझ्याकडे पाठवून दे, तुला दहा हजार रुपये देतो आणि तुझ्या प्रकरणात कारवाईत सहकार्य करतो,” अशा स्वरूपाची लज्जास्पद मागणी त्यांनी केल्याचा आरोप आहे.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलेने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात तत्काळ चौकशी सुरू करण्यात आली. प्राथमिक चौकशीत आरोपांमध्ये तथ्य आढळल्याने ASI राजेश जाधव यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले.
विशेष म्हणजे, जाधव यांच्यावर यापूर्वीही अशाच प्रकारचे गंभीर आरोप झाले होते आणि त्यावेळीही त्यांना निलंबनाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे त्यांच्या वर्तनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या प्रकरणामुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली असून, महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या गैरवर्तनाला अजिबात सहन केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पीडित महिलेला न्याय मिळावा आणि दोषी अधिकाऱ्यावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
إرسال تعليق