आंबेडकर प्रेस कौन्सिलच्या वतीने जिल्हा परिषद सीईओ विवेक गायकवाड यांचा सत्कार

आंबेडकर प्रेस कौन्सिलच्या वतीने जिल्हा परिषद सीईओ विवेक गायकवाड यांचा  सत्कार

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
30 मार्च 2026
हिंगोली : हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आदरणीय विवेक गायकवाड यांना 150 दिवसांच्या उत्कृष्ट व प्रभावी शासकीय कामकाजाबद्दल राज्यस्तरीय  सेवाक्रमी  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, या उल्लेखनीय कार्याबद्दल आंबेडकर प्रेस कौन्सिलच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हिंगोली जिल्हा परिषदेने अल्पावधीत विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत नागरिकाभिमुख प्रशासनाचा आदर्श निर्माण केला आहे. याची दखल घेत राज्य शासनाने हा सन्मान बहाल केला.
सत्कार सोहळ्यात बोलताना विवेक गायकवाड यांनी नम्रपणे सांगितले की, “हा पुरस्कार माझा नसून हिंगोली जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आहे. त्यांच्या एकजुटीच्या आणि प्रामाणिक परिश्रमामुळेच जिल्हा परिषदेचे नाव राज्यभर उंचावले आहे.” त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आंबेडकर प्रेस कौन्सिलच्या वतीने आयोजित या सत्कार कार्यक्रमात पत्रकार सुधाकर वाढवे व पत्रकार संतोष भिसे यांनी गायकवाड यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. यावेळी विविध मान्यवर, अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंगोली जिल्हा परिषदेच्या कामगिरीमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा एक नवा आदर्श निर्माण झाला असून, पुढील काळातही असेच लोकाभिमुख व पारदर्शक कामकाज सुरू राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
सदर माहिती विवेक गायकवाड यांनी ‘महाराष्ट्र 24 न्यूज’शी बोलताना दिली.

Post a Comment

أحدث أقدم