हिंगोलीत घरकुल हप्त्यांच्या विलंबामुळे लाभार्थ्यांचा संताप; प्रशासनाला इशारा
हिंगोली, दि. 08 एप्रिल 2026:
हिंगोली तालुक्यातील शेकडो घरकुल लाभार्थ्यांचे प्रलंबित हप्ते गेल्या दोन महिन्यांपासून न मिळाल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या घरकुल योजनेवर विश्वास ठेवून अनेक लाभार्थ्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर घरबांधणी सुरू केली असून काहींनी अर्धवट काम पूर्ण केले आहे, तर काहींची घरे अंतिम टप्प्यात आहेत. मात्र हप्ते न मिळाल्यामुळे ही सर्व कामे सध्या ठप्प झाली आहेत.
लाभार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित अधिकाऱ्यांकडून “ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाली आहे” अशी केवळ औपचारिक उत्तरे दिली जात आहेत. प्रत्यक्षात मात्र त्यांच्या खात्यात कोणतीही रक्कम जमा होत नसल्याची तक्रार आहे. यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून गरीब नागरिकांच्या हक्कांची पायमल्ली होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
सध्याच्या परिस्थितीत अनेक घरकुलधारकांना कर्ज काढून घर पूर्ण करण्याची वेळ आली आहे. शासनाच्या विलंबित यंत्रणेचा थेट परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होत असून ही बाब अत्यंत गंभीर आणि संतापजनक असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर मा. जि.प. सदस्य माधव कोरडे यांनी प्रशासनाला ठाम इशारा दिला आहे. प्रलंबित सर्व हप्ते तात्काळ मंजूर करून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावेत, तसेच विलंबास जबाबदार अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पेमेंट प्रक्रियेत येणारे अडथळेही तातडीने दूर करावेत, असे त्यांनी नमूद केले.
अन्यथा, येत्या काळात जनतेचा तीव्र रोष रस्त्यावर उतरेल आणि या प्रश्नावर मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या संभाव्य आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
إرسال تعليق