हिंगोलीत हेल्मेटधारक दुचाकीस्वारांचा गुलाबाचे फुल देऊन सत्कार; नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई
पोलीस निरीक्षक शरद मरे
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
२५ एप्रिल 2026
हिंगोली : शहरातील वाहतूक शिस्तीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हिंगोली शहर वाहतूक शाखेच्या वतीने आज नांदेड नाका परिसरात विशेष उपक्रम राबविण्यात आला. हेल्मेट घालून दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांना गुलाबाचे फुल पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या अभिनव उपक्रमामुळे काही काळासाठी परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांच्या आदेशाने पोलीस उपविभागीय अधिकारी कुंदन कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक शरद मरे
यांच्या पथकामध्ये
वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब गुमनर, गजानन राठोड संतोष घुगे, शिवाजी पारस्कर, सुखदेव जाधव तसेच महिला पोलीस कर्मचारी विद्या भुजबळे आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी स्वतः रस्त्यावर उभे राहून हेल्मेटधारकांना प्रोत्साहन दिले.
दरम्यान, ज्या दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर केला नव्हता, त्यांनाही गुलाब देऊन सन्मानित करण्यात आले. मात्र, हा सन्मान इशाऱ्यासह देण्यात आला. यापुढे हेल्मेटचा वापर न केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा वाहतूक शाखेकडून देण्यात आला.
तथापि, शहरात वाहतूक नियमांविषयी पोलीस प्रशासनाकडून करण्यात येणारी जनजागृती अपुरी पडत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. केवळ अधूनमधून असे उपक्रम राबवून अपेक्षित बदल साध्य होणार नाही, तर सातत्याने मोहिमा, शाळा-कॉलेजांमध्ये मार्गदर्शन, तसेच कठोर अंमलबजावणी आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते, हे सर्वश्रुत असले तरी प्रत्यक्षात अनेक वाहनचालक नियमांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. त्यामुळे पोलीस प्रशासनाने जनजागृतीसोबतच कडक कारवाईचीही जोड देणे गरजेचे असल्याचे जाणकारांचे मत आहे.
إرسال تعليق