ई-संजीवनीद्वारे दोन लाख रुग्णांना सेवा : डॉ. बालाजी भाकरे यांचा मंत्री झीरवाळ यांच्या हस्ते होणार गौरव

ई-संजीवनीद्वारे दोन लाख रुग्णांना सेवा : डॉ. बालाजी भाकरे यांचा  मंत्री झीरवाळ यांच्या हस्ते होणार गौरव 
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
30 एप्रिल 2026 
हिंगोली, प्रतिनिधी : डिजिटल आरोग्य सेवेच्या माध्यमातून दुर्गम भागातील रुग्णांपर्यंत उपचार पोहोचवत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. बालाजी भाकरे यांनी ई-संजीवनी सेवेद्वारे आतापर्यंत तब्बल दोन लाख रुग्णांना सेवा दिली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. पालकमंत्री जिरवाळा यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडणार असून, त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात देखील डॉ. भाकरे यांच्या कार्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
इसवी सन २०२० पासून सुरू झालेल्या ई-संजीवनी या डिजिटल आरोग्य सेवेच्या माध्यमातून डॉ. भाकरे यांनी ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांना तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्ध करून देत आरोग्य सेवेत मोलाची भर घातली आहे. तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून त्यांनी हजारो रुग्णांचे आरोग्य सुधारण्यास हातभार लावला आहे.
दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली येथील विविध विभागांमध्ये उत्कृष्ट सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून विशेष प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेल्या अधिकृत पत्राद्वारे १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या अधिकाऱ्यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्याची विनंती करण्यात आली आहे.
या प्रस्तावित यादीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तसर यांचे एनआरसी (पोषण पुनर्वसन केंद्र) व आयुष्मान भारत डिजिटल योजनेतील नेतृत्व विशेष उल्लेखनीय ठरले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील सेवा गुणवत्ता लक्षणीयरीत्या उंचावली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तसेच, एनआरसी विभागात सातत्याने उत्कृष्ट कार्य करणारे डॉ. गोपाल कदम, अस्थिरोग विभागातील प्रभावी सेवा देणारे डॉ. मनीष बागडिया आणि ई-संजीवनी सेवेत महत्त्वपूर्ण योगदान देणारे डॉ. बालाजी भाकरे यांची कामगिरी विशेषत्वाने अधोरेखित करण्यात आली आहे.
याशिवाय, मुख कर्करोग निदान व उपचार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. फैसल एस. खान यांचाही या यादीत समावेश असून, त्यांच्या कार्यामुळे अनेक रुग्णांना वेळेवर निदान व उपचार मिळाले आहेत.
तंबाखूविरोधी मोहिमेत सक्रिय भूमिका बजावणारे एनटीसीपी (राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम) अंतर्गत समुपदेशक श्री. आनंद साळवे यांच्या कार्यालाही विशेष दाद देण्यात आली आहे. कोटपा अधिनियम २००३ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांनी केलेल्या जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे मोहिमेला गती मिळाली आहे.
या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देणे आणि इतरांना प्रेरणा मिळावी हा या सन्मानामागील मुख्य उद्देश असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त होणारा हा सत्कार सोहळा हिंगोली जिल्ह्यातील आरोग्य सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मनोबलात निश्चितच भर घालणारा ठरणार आहे.

Post a Comment

أحدث أقدم