ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी वाढविणारा ‘व्हिजन फोरम २०२६’ उपक्रम
हिंगोली, प्रतिनिधी : लेखन फाऊंडेशन, VISION समिती आणि शिक्षण विभाग, जिल्हा परिषद हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘व्हिजन फोरम २०२६’ अंतर्गत शिक्षक व विद्यार्थी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून हा सोहळा शुक्रवार, दि. १ मे २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील डी. पी. सी. सभागृह येथे पार पडणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाबद्दल जिज्ञासा निर्माण करणे, निरीक्षणशक्ती वाढविणे आणि प्रयोगशीलता विकसित करणे या उद्देशाने ‘व्हिजन फोरम’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी दोन महिन्यांच्या कालावधीत संकल्पनाधारित शिक्षण, विविध प्रयोग, शैक्षणिक उपक्रम तसेच ऑनलाइन सराव प्रश्नांच्या माध्यमातून विज्ञान विषयात लक्षणीय प्रगती साधली आहे. या प्रक्रियेत शिक्षकांनी मार्गदर्शक व प्रेरणादायी भूमिका निभावत विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना दिली आहे.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री मा. श्री नरहरी झिरवळ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच खासदार मा. श्री नागेश पाटील आष्टीकर, आमदार मा. श्री तान्हाजी मुटकुळे, मा. श्री राजुभय्या नवघरे, मा. श्री संतोष बांगर तसेच राज्यसभेचे खासदार मा. श्री रामरावजी वडकुते यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी मा. श्री राहुल गुप्ता (भा.प्र.से.), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री विवेक गायकवाड (भा.प्र.से.), शिक्षणाधिकारी (योजना) मा. श्री संदीपकुमार सोनटक्के, डायट हिंगोलीचे प्राचार्य मा. श्री भानुदास पुटवाड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा. श्रीमती आसावरी काळे तसेच शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मा. श्री विपुल भागवत यांची उपस्थिती राहणार आहे.
या गौरव सोहळ्यात विज्ञान विषयात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे. ग्रामीण शिक्षण व्यवस्थेत गुणवत्तावाढीसाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लेखन फाऊंडेशनचे संचालक श्री सुरज कदम यांनी केले आहे.
إرسال تعليق