इन्स्टाग्रामवरील ओळख ठरली धोकादायक; तरुणीचा विनयभंग, आरोपीचा शोध सुरू

इन्स्टाग्रामवरील ओळख ठरली धोकादायक; तरुणीचा विनयभंग, 
आरोपीचा  शोध सुरू
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
6 एप्रिल 2026
 सेनगाव (जि. हिंगोली) : सोशल मीडियावरून झालेली ओळख एका तरुणीसाठी धोकादायक ठरल्याची धक्कादायक घटना सेनगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणाने थेट गावात येत तरुणीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील एका तरुणीची इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून अहिल्यानगर जिल्ह्यातील विष्णु करांडे (रा. खडकामडका, ता. शेवगाव) याच्याशी ओळख झाली होती. ओळखीनंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. या संवादाचा गैरफायदा घेत आरोपीने तरुणीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून तिचे छायाचित्र डाउनलोड केले.
दरम्यान, तरुणीने सुरुवातीला या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याने आरोपीने ती आपल्या प्रेमात असल्याचे गृहीत धरले. काही दिवसांपूर्वी तो थेट अहिल्यानगरहून सेनगाव तालुक्यात आला. तरुणी घराबाहेर असताना तिचा शोध घेत त्याने तिला गाठले व तिच्यासोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला.
या घटनेदरम्यान घाबरलेल्या तरुणीने आरडाओरडा केल्याने तिचा भाऊ तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. त्याने आरोपीला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली व तेथून पळ काढला.
घटनेनंतर तरुणीने आपल्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांसह सेनगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीवरून विष्णु करांडे याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक नागनाथ पाटील व जमादार सुभाष चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली असून लवकरच त्याला ताब्यात घेण्यात येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सोशल मीडियावरील ओळखींबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Post a Comment

أحدث أقدم