पोलिस स्टेशन सेनगावची गांजा तस्करीविरोधात मोठी कारवाई; 2 लाखांचा मुद्देमाल जप्त
02 मे 2026
हिंगोली : पोलिस स्टेशन सेनगावच्या वतीने गांजा तस्करीविरोधात प्रभावी कारवाई करत एक आरोपीस अटक करण्यात आली असून सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मौजे कापडसिंगी येथे लोणार रोडलगत पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईदरम्यान एका संशयित इसमास ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव नंदाजी मोहन चव्हाण (वय 36 वर्षे, रा. खुरामपूर, ता. लोणार, जि. बुलढाणा) असे सांगितले.
पोलिसांनी त्याच्या जवळील पोत्याची तपासणी केली असता त्यामध्ये 4.800 किलो वाळलेला गांजा आढळून आला. या गांजाची किंमत अंदाजे 1,20,000 रुपये आहे. यासोबतच एक मोटरसायकल (किंमत 70,000 रुपये) आणि एक मोबाईल फोन असा एकूण सुमारे 2,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर मुद्देमाल कायदेशीररित्या जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये पोलिस स्टेशन सेनगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईबाबत हिंगोली पोलिसांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणीही अमली पदार्थांचे सेवन, विक्री किंवा साठा करू नये. अन्यथा संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक श्री. कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के, तहसीलदार श्री. कारगुडे, कृषी सहायक श्री. सूर्यवंशी, ग्राम अधिकारी श्री. मुंडे, तसेच पोलीस कर्मचारी जीवन मस्के, वंजारे, थिटे, जैस्वाल, चालक गजानन मुटकुळे, पो. शि. गजानन सरकटे, वजन मापारी शंकर तिडके, फोटोग्राफर व फॉरेन्सिक टीम यांचा सहभाग होता.
आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
إرسال تعليق