बासंबा पोलीस ठाण्यातील वाहन पूजन प्रकरणी कारवाईचे आश्वासन; रिपब्लिकन सेनेचा निषेध

बासंबा पोलीस ठाण्यातील वाहन पूजन प्रकरणी कारवाईचे आश्वासन; रिपब्लिकन सेनेचा निषेध

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
04मे 2026 
हिंगोली (प्रतिनिधी): बासंबा पोलीस ठाण्यात शासकीय वाहनाच्या उद्घाटनावेळी एका विशिष्ट धर्माच्या पुजाऱ्याकडून धार्मिक विधी करून वाहन पूजन करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणाला आता राजकीय व सामाजिक स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच संबंधित पुजाऱ्याकडून पोलीस व्हॅनचे स्टेअरिंग देऊन ट्रायलही करून घेण्यात आल्याची बाब उघड झाल्याने यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
या घटनेचा रिपब्लिकन सेनेने तीव्र निषेध नोंदविला असून, भारतीय संविधानाच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वांचा भंग झाल्याचा आरोप केला आहे. रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण वामण घोंगडे यांनी सांगितले की, भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून संविधानातील कलम १४, १५ व २५ नुसार सर्व नागरिकांना समान वागणूक देणे बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत शासकीय मालमत्तेचे उद्घाटन एका धर्माच्या पद्धतीने करणे हे धार्मिक पक्षपात दर्शवणारे असून इतर समाजघटकांच्या भावनांचा अपमान करणारे आहे.
पोलीस प्रशासनाकडून अशा प्रकारची कृती होणे ही अत्यंत गंभीर बाब असून त्यामुळे त्यांच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणी संबंधित सहायक पोलीस निरीक्षक व कर्मचाऱ्यांवर तात्काळ विभागीय चौकशी करून दोषींवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात यावीत, अशी मागणी रिपब्लिकन सेनेने केली आहे.
यासोबतच, चौकशी पारदर्शक व निष्पक्ष पद्धतीने होऊन दोषींवर ठोस कारवाई झाली नाही, तर पुढील काळात शांततामय पण तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी रिपब्लिकन सेनेचे विधी आघाडी प्रमुख ॲड. रावण धाबे, रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष दिनेश हनुमंते, जिल्हाध्यक्ष राजू इंगोले, सामाजिक कार्यकर्ते चंद्रमुनी पाईकराव, महासचिव सिद्धांत गायकवाड, तसेच कादिर मौलाना आदी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षकांचे कारवाईचे आश्वासन
दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी चौकशीचे आदेश दिले असून, सरकारी सेवा शिस्तीचा भंग झाल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
“आमची भूमिका धर्मविरोधी नाही” — रिपब्लिकन सेना
रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांनी स्पष्ट केले की, संघटनेची भूमिका कोणत्याही धर्म, जाती किंवा व्यक्तीविरोधात नसून संविधानाच्या तत्त्वांची पायमल्ली करणाऱ्या कृतीविरोधात आहे. शासन व प्रशासनाने धर्मनिरपेक्षतेचे पालन करत सर्व नागरिकांना समान वागणूक देणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

Post a Comment

أحدث أقدم