सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती; शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण

सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती; शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
08 मे 2026
हिंगोली | प्रतिनिधी
हिंगोली तहसील कार्यालय येथे गुरुवार दि. ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत नागरिकांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले, तसेच महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचे तत्काळ निराकरण करून नागरिकांना मोठा दिलासा देण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिक, युवक आणि विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारीपासून सावध राहण्याचे आवाहन केले. मोबाईलवर येणारे बनावट कॉल, फसवे लिंक, ओटीपी शेअर करणे, सोशल मीडियावरील आर्थिक फसवणूक यांसारख्या वाढत्या सायबर गुन्ह्यांविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
“अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक माहिती देऊ नये, कोणत्याही आमिषाला बळी पडू नये आणि संशयास्पद प्रकार त्वरित पोलिसांना कळवावेत,” असे आवाहन पोलीस निरीक्षक डोंगरे यांनी केले. यासोबतच केंद्र व राज्य शासनाने लागू केलेल्या नवीन कायद्यांविषयीही त्यांनी उपस्थितांना माहिती देत कायद्याबाबत जनजागृती केली.
या शिबिरामध्ये फेरफार, सातबारा उतारे, वारस नोंदणी, जमीन अभिलेख आणि इतर महसूल विषयक अर्जांची जागेवरच छाननी करून अनेक प्रकरणे मार्गी लावण्यात आली. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या अडचणी ऐकून तत्काळ कार्यवाही केल्यामुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमास नगरपरिषदेचे साबळे साहेब, डॉ. भागवत महाले, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, आरोग्य विभागाचे प्रतिनिधी, कृषी विभागाचे रणशूर साहेब, भूमी अभिलेख विभागाचे हनुमंत सूर्यवंशी, पुरवठा विभागाचे अनिल घुगे साहेब, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच विविध विभागांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासनाच्या योजना प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविणे, नागरिकांच्या प्रलंबित समस्या सोडविणे आणि सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करणे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Post a Comment

أحدث أقدم