हिंगोली पंचायत समितीत दौऱ्याच्या नावाखाली अधिकारी-कर्मचारी गायबनागरिकांची गैरसोय वाढली; रिकाम्या खुर्च्यांनी उघड केली प्रशासनाची उदासीनता

हिंगोली पंचायत समितीत दौऱ्याच्या नावाखाली अधिकारी-कर्मचारी गायब
नागरिकांची गैरसोय वाढली; रिकाम्या खुर्च्यांनी उघड केली प्रशासनाची उदासीनता

महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क 
11 मे 2024,
हिंगोली | प्रतिनिधी
हिंगोली पंचायत समिती कार्यालयात आज दुपारी अचानक फेरफटका मारला असता अनेक विभागांमध्ये अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. कृषी विभाग, पशुधन विभाग, बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग तसेच व्हीसी हॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर रिकाम्या खुर्च्या दिसून आल्या. त्यामुळे पंचायत समितीच्या कामकाजाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील अनेक महिन्यांपासून काही कर्मचारी व अधिकारी “दौऱ्यावर” असल्याचे कारण देत कार्यालयात अनुपस्थित राहत असून, प्रत्यक्षात वैयक्तिक कामांसाठी वेळ घालवत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि ग्रामीण भागातील लाभार्थींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
खेड्यापाड्यातील नागरिक विविध शासकीय कामांसाठी पंचायत समिती कार्यालयात येत असतात. मात्र संबंधित विभागात अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित नसल्याने नागरिकांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेकदा कार्यालयात कोणीही उपलब्ध नसल्याने नागरिकांचे काम न होताच त्यांना परत जावे लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया लाभार्थींनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे, पंचायत समितीतील काही विभागांमध्ये कामकाजाच्या वेळेतही शुकशुकाट असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
दरम्यान, या प्रकाराची दखल घेत संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड कोणती कारवाई करणार, याकडे आता सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. पंचायत समितीतील गैरहजेरीचे प्रकार थांबवून नागरिकांना वेळेत सेवा मिळावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

Post a Comment

أحدث أقدم