हिंगोलीतही ‘नीट’ पेपरफुटीचे लाभार्थी पालकांमध्ये कुजबुज सुरू...!
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
21 मे 2026
Hingoli : देशभर गाजत असलेल्या NEET Examination पेपरफुट प्रकरणाची व्याप्ती आता मराठवाड्यातही वाढत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. नांदेड येथील आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक मोटेगावकर यांचा या प्रकरणाशी थेट संबंध असल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मागील काही वर्षांत नांदेड शहर कोचिंग क्लासेसचे मोठे केंद्र बनले असून, कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय उभा राहिला आहे. मात्र, पेपरफुटीच्या आरोपांमुळे या व्यवसायाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या कोचिंग क्लासमध्ये Hingoli जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, दहा ते पंधरा लाख रुपये खर्च करून काही पालकांनी आपल्या पाल्यांना कथितरीत्या फायदा मिळवून दिल्याची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे. तपास यंत्रणेला अशा काही लाभार्थी पालकांची नावे मिळाल्याची चर्चा असून, त्यामुळे शहरात भीती आणि उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सामान्य पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी दिवस-रात्र मेहनत करून स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना, काही आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांनी पैशाच्या जोरावर गैरमार्गाचा अवलंब केल्याचा आरोप होत आहे. अनेक पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढत आहेत, दागिने विकत आहेत, तर दुसरीकडे प्रश्नपत्रिका आधीच मिळाल्याच्या चर्चेमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्यावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पेपरफुट प्रकरणातील लाभार्थ्यांची यादी घेऊन तपास यंत्रणा पुन्हा नांदेडमध्ये दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील काही चर्चित कुटुंबांची नावेही स्थानिक पातळीवर चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तपास यंत्रणेचे अधिकारी हिंगोलीत कधी दाखल होणार आणि या प्रकरणात आणखी कोणाची नावे समोर येणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत कोणालाही दोषी ठरवता येणार नसले तरी या प्रकरणामुळे स्पर्धा परीक्षांच्या पारदर्शकतेवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित अशा गंभीर प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.
إرسال تعليق