कळमनुरी खूनप्रकरणातील फरार दोन आरोपी जेरबंदवाशिम-अकोला महामार्गावर पाच तास नाकाबंदी; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

कळमनुरी खूनप्रकरणातील फरार दोन आरोपी जेरबंद
वाशिम-अकोला महामार्गावर पाच तास नाकाबंदी; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

कळमनुरी, प्रतिनिधी :
कळमनुरी शहरातील साईनगर परिसरात युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याच्या गाजलेल्या प्रकरणातील फरार असलेल्या दोन मुख्य आरोपींना अखेर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. वाशिम-अकोला महामार्गावर तब्बल पाच तास नाकाबंदी करून ही धडक कारवाई करण्यात आली.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन कळमनुरी हद्दीत २२ मे २०२६ रोजी शुक्रवारी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास साईनगर परिसरातील खुल्या मैदानात एका युवकाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली होती. या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. मात्र, गुन्ह्यातील दोन मुख्य आरोपी घटना घडल्यानंतर फरार झाले होते.
फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सातत्याने आरोपींच्या मागावर होते. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी वाशिम-अकोला महामार्गावरून प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने तात्काळ महामार्गावर नाकाबंदी केली. तब्बल पाच तास सुरू असलेल्या या विशेष मोहिमेत पोलिसांनी फरार आरोपी
१) आकाश विठ्ठल सातव (वय २८, रा. पाटील गल्ली, कळमनुरी)
आणि
२) भरत शंकरलाल यादव (वय २५, रा. साईनगर, कळमनुरी)
यांना ताब्यात घेत अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन कळमनुरी येथे हजर करण्यात आले असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि शिवसांब घेवारे, पोउपनि माधव जीवारे, तसेच पोलीस अमलदार गजानन पोकळे, सतीश जाधव, शिवाजी जाल्मिरे आणि हरिभाऊ गुंजकर यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Post a Comment

أحدث أقدم