मोहम्मदिया इंग्लिश स्कूलचा दहावीचा सलग दुसऱ्या वर्षी १००% निकाल
विद्यार्थ्यांच्या यशाने शाळेने गाठले नवे शिखर ; गुणवंतांचा सत्कार
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली, दि. ८ मे :
आजम कॉलनी परिसरातील प्रतिष्ठित मोहम्मदिया इंग्लिश School ने इयत्ता दहावीच्या परीक्षेत सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी करत यशाची परंपरा कायम राखली आहे. शाळेतील सर्व विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्याने शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यंदाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत शाळेचा नावलौकिक वाढवला. यामध्ये तौसीफ जमीर शेख याने ७८ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तर सारा जैनब मझहर अहमद खान हिने ७०.२० टक्के गुण मिळवून द्वितीय स्थान मिळविले. तसेच अमीना बुशरा शेख ख्वाजा तारिकउद्दीन हिने ६७ टक्के गुण संपादन करून उल्लेखनीय यश प्राप्त केले.
या शानदार निकालामुळे पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा सातत्यपूर्ण पाठिंबा महत्त्वाचा ठरल्याची भावना शाळा प्रशासनाने व्यक्त केली.
शाळेच्या मुख्याध्यापिका सालेहा मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. “विद्यार्थ्यांनी चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. भविष्यातही त्यांनी असेच यश संपादन करावे,” असे त्या म्हणाल्या.
संस्थाध्यक्ष निहाल भैय्या यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,
“आमच्या शाळेचा उद्देश केवळ परीक्षेतील यश नसून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवणे हा आहे. विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीच्या बळावर हे यश संपादन केले असून भविष्यातही शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध राहील.”
या यशात मुख्याध्यापिका सालेहा मॅडम, सय्यद राबिया मॅडम, सचिन सर, तौसीफ सर, हनिफा मॅडम, शबनम मॅडम, मौलाना अर्शद सर, मौलाना तोहीद सर, मुस्कान मॅडम तसेच संपूर्ण शिक्षकवृंद आणि शाळा परिवाराचे विशेष योगदान असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
दरम्यान, गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
إرسال تعليق