केळी पिकाच्या अनुदानासाठी लाच मागणाऱ्या कृषी अधिकाऱ्यास रंगेहात अटक
महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क
19 जून 2026
हिंगोली (प्रतिनिधी) : केळी पिकाच्या अनुदानासाठी लाच मागणाऱ्या कृषी विभागातील सहाय्यक कृषी अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडत मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. १८ जून २०२६) औंढा तालुक्यात करण्यात आली.
या प्रकरणातील आरोपी मोहन भगवानराव माने (वय ४३) हे कृषी सहाय्यक सजा जलालपूर, ता. औंढा (ना.), जिल्हा हिंगोली येथे सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार (वय ३४, रा. दोडगाव, ता. औंढा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या वडिलोपार्जित शेतजमीन गट क्रमांक २११ मध्ये केळीची लागवड केली असून, त्या पिकासाठी शासनाचे अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या सहा मस्टरवर सही करून ती कागदपत्रे तालुका कृषी अधिकाऱ्याकडे पाठवण्यासाठी आरोपीने प्रत्येकी १ हजार रुपये प्रमाणे एकूण ६ हजार रुपयांची लाच मागितली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता आरोपीने पंचासमक्ष लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. तडजोडीनंतर ही रक्कम ५ हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली.
यानंतर सापळा रचण्यात आला. औंढा-हिंगोली मार्गावरील गुळाच्या चहाच्या टपरीजवळ आरोपीने तक्रारदाराकडून पंचांच्या उपस्थितीत ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबी पथकाने त्याला रंगेहात पकडले.
कारवाईदरम्यान आरोपीकडून मोबाईल, पाकीट, विविध ओळखपत्रे तसेच १४,७२० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. मोबाईलची तपासणी सुरू असून आवश्यकतेनुसार तो जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीच्या घराची झडती घेण्याची कारवाईही सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणी औंढा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक विकास घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू हे करीत आहेत.
दरम्यान, या कारवाईमुळे जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेत खळबळ उडाली असून, लाचखोरीविरोधात एसीबीने कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
إرسال تعليق