औंढा नागनाथ पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; २० लाख ९ हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
16 जून 2026
हिंगोली प्रतिनिधी | औंढा नागनाथ
औंढा नागनाथ पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत २० लाख ९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई १५ जून रोजी पहाटे औंढा नागनाथ-जिंतूर मार्गावरील माथा पाटी परिसरात करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक नियमित गस्तीवर असताना अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या हायवा टिप्परची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून एमएच-३८-एक्स-४३१७ क्रमांकाचा हायवा टिप्पर ताब्यात घेतला.
तपासणीदरम्यान वाहनामध्ये विनापरवाना उत्खनन करून चोरट्या मार्गाने वाहतूक करण्यात येणारी वाळू आढळून आली. पोलिसांनी संबंधित वाहनासह त्यातील वाळू जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या टिप्परची किंमत २० लाख रुपये, तर वाळूची किंमत ९ हजार रुपये असून, एकूण २० लाख ९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस शिपाई राजकुमार कुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सूरज पांडुरंग कराळे (रा. असोला तर्फ लाख) याच्याविरुद्ध औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात १५ जून रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल इंगोले करीत आहेत.
إرسال تعليق