हिंगोलीत कचऱ्यात नवजात बालक आढळले; उपचार सुरू, पोलिसांकडून शोधमोहीम
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
09जून 2026
हिगोली, दि. ८ जून : शहरातील शासकीय विश्रामगृह परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली असून, शासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाजवळ कचऱ्यात टाकलेले पुरुष जातीचे नवजात बालक आढळून आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या भिंतीलगत असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक नवजात बालक फेकून दिल्याची माहिती हिंगोली शहर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार अशोक धामणे, सुनील अंभोरे, ज्ञानेश्वर मस्के, बालाजी डवरे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता, अंदाजे पाच दिवस ते एक महिन्याच्या दरम्यान वय असलेले पुरुष जातीचे नवजात बालक कचऱ्यात आढळून आले. संबंधित बालकाची प्रकृती लक्षात घेता त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
या अमानुष घटनेप्रकरणी बालकाला कचऱ्यात फेकून देणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याबरोबरच नागरिकांकडूनही माहिती गोळा करण्यात येत आहे.
दरम्यान, अशा प्रकारच्या घटना समाजातील संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या असल्याने दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
إرسال تعليق