करणीच्या संशयातून वृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या; तिघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

  करणीच्या संशयातून वृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या; तिघांना अटक
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
3 जुलै 2026 
हिंगोली, दि. ३ जुलै : पारडा शेत शिवारातील आखाड्यावर राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याची करणी करत असल्याच्या संशयातून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तिघा आरोपींना अटक करून खुनाचा गुन्हा अवघ्या १२ दिवसांत उघडकीस आणला आहे.
याप्रकरणी अनिल बळीराम वाघमारे (वय ४०, व्यवसाय-शेती, रा. पारडा, ता. जि. हिंगोली) यांनी दि. २१ जून २०२६ रोजी बासंबा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे आई-वडील पारडा शेत शिवारातील आखाड्यावर असताना अज्ञात व्यक्तीने घातक शस्त्राने वार करून त्यांचा खून केला होता. यावरून बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी हा गुन्हा तातडीने उघडकीस आणण्याचे निर्देश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एस. अरसेवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली.
तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी राहुल सम्राट खंदारे (वय ३२, व्यवसाय-चालक, रा. इसापूर रमना, ता. जि. हिंगोली), अक्षय घनश्याम वाघमारे (वय ३०, व्यवसाय-मजुरी, रा. पारडा) आणि राजू गौतम वाघमारे (वय ३३, रा. पारडा) या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली.
चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या माहितीनुसार, बळीराम देवबा वाघमारे आणि त्यांची पत्नी कलावती बळीराम वाघमारे हे करणी करत असल्याचा संशय आरोपींना होता. तसेच आरोपी राजू वाघमारे याची प्रकृती वारंवार बिघडत असल्याने त्यामागे बळीराम व कलावती वाघमारे यांनी केलेली करणी कारणीभूत असल्याचा त्याचा समज झाला होता. याच संशयातून त्याने साथीदार राहुल खंदारे व अक्षय वाघमारे यांना सोबत घेत संबंधित दाम्पत्याच्या शेतातील आखाड्यावर जाऊन त्यांची हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एस. अरसेवार, पोलीस उपनिरीक्षक माधव जिव्हारे तसेच पोलीस अंमलदार पांडुरंग राठोड, गजानन पोकळे, लिंबाजी वाव्हळे, निरंजन नलवार, सतीश जाधव, नरेंद्र साळवे, दत्ता नागरे, प्रदीप झुंगरे, इरफान पठाण आणि मारोती काकडे यांनी सहभाग घेतला.
गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन त्यांना अल्पावधीत जेरबंद करणाऱ्या तपास पथकाचे पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم