अत्यवस्थ बाळंतीणीला मृत्यूच्या दारातून परत आणले; जीएमसी हिंगोलीच्या डॉक्टरांची ३० मिनिटांत जीवदान देणारी शस्त्रक्रिया

अत्यवस्थ बाळंतीणीला मृत्यूच्या दारातून परत आणले; जीएमसी हिंगोलीच्या डॉक्टरांची ३० मिनिटांत जीवदान देणारी शस्त्रक्रिया

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
15 जुलै 2026 
हिंगोली, प्रतिनिधी :
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी), हिंगोली येथील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र (OBGY), भूलशास्त्र विभाग, रक्तपेढी, आयसीयू आणि ओटी टीमच्या समन्वयातून अत्यंत गंभीर अवस्थेतील एका बाळंतीणीचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. 'युटेरिन इन्व्हर्जन' (Uterine Inversion) अर्थात प्रसूतीनंतर गर्भाशय उलटण्याच्या दुर्मिळ व जीवघेण्या गुंतागुंतीमुळे संबंधित माता मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचली होती. मात्र, डॉक्टरांनी केवळ ३० मिनिटांत अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून तिचे प्राण वाचवले.
प्रसूतीनंतर अचानक गंभीर गुंतागुंत
कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात संबंधित महिलेची प्रसूती झाल्यानंतर तिला युटेरिन इन्व्हर्जन ही दुर्मिळ गुंतागुंत निर्माण झाली. गर्भाशय उलटल्याने तिला प्रचंड रक्तस्राव सुरू झाला आणि काही क्षणांतच ती हेमोरेजिक शॉक व न्यूरोजेनिक शॉकमध्ये गेली. तिचा रक्तदाब अवघा ५० मिमी एचजी इतका खाली आला होता. शरीरातील रक्ताची पातळी अत्यंत कमी झाल्याने रुग्ण मृत्यूशी झुंज देत होती.
वेळीच दिलेल्या माहितीमुळे जीएमसीची पूर्वतयारी
कळमनुरी येथील डॉ. संतोष जाधव यांनी संध्याकाळी ५.१० वाजता जीएमसी हिंगोलीच्या स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. लीला करपे यांच्याशी संपर्क साधून रुग्णाची गंभीर स्थिती सांगितली. तसेच महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल यांनीही परिस्थितीची पूर्वकल्पना दिली. त्यानंतर डॉ. करपे यांनी रुग्णाला थेट ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल करण्याचे निर्देश दिले. रुग्ण येण्यापूर्वीच भूलतज्ज्ञ, ओटी कर्मचारी, रक्तपेढी आणि आयसीयू टीमला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
रुग्णालयात पोहोचताच सुरू झाली जीव वाचविण्याची धडपड
संध्याकाळी ५.४५ वाजता रुग्ण जीएमसीमध्ये दाखल झाली. त्यावेळी ती अर्धवट शुद्धीत होती. नाडीचे ठोके अत्यंत मंद होते आणि रक्तदाब मोजताही येत नव्हता. तपासणीत तिचे हिमोग्लोबिन अवघे ४.५ ग्रॅम असल्याचे स्पष्ट झाले.
भूलतज्ज्ञांची तातडीची उपचार प्रक्रिया
डॉ. अमोल धूळधुळे, डॉ. स्वप्नील चव्हाण आणि डॉ. शुभांगी यांच्या भूलतज्ज्ञांच्या पथकाने तातडीने आयव्ही लाईन सुरू करून आवश्यक औषधोपचार, द्रवपदार्थ आणि नॉरॲड्रेनालिन ड्रिप सुरू केली. त्याचवेळी डॉ. लीला करपे यांनी तपासणी करून Incomplete Uterine Inversion आणि पोटामध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत असल्याचे निदान केले.
गर्भाशय वाचविण्याचा प्रयत्न अपयशी; अखेर गर्भाशय काढण्याचा निर्णय
रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी तातडीने लॅप्रोटॉमी करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान गर्भाशय पूर्णपणे आत उलटलेले असून त्याचा 'फ्लॉवरपॉट अपिअरन्स' दिसून आला. डॉक्टरांनी प्रथम गर्भाशय पूर्वस्थितीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रचंड रक्तस्रावामुळे गर्भाशय अत्यंत सैल झाले होते आणि रक्तस्त्राव थांबत नव्हता.
रुग्णाचा जीव धोक्यात असल्याने नातेवाईकांना परिस्थितीची माहिती देऊन लेखी संमती घेत ऑब्स्टेट्रिक हिस्टरेक्टॉमी (गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया) करण्याचा निर्णय घेण्यात आला.
३० मिनिटांत यशस्वी शस्त्रक्रिया; रक्तदाबात चमत्कारिक सुधारणा
डॉक्टरांच्या टीमने अवघ्या ३० मिनिटांत अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. गर्भाशयाच्या रक्तवाहिन्या बांधताच रुग्णाचा रक्तदाब ६० वरून थेट १०० मिमी एचजीपर्यंत सुधारला. शस्त्रक्रियेदरम्यान तिला ३ युनिट रक्त आणि ३ युनिट एफएफपी (Fresh Frozen Plasma) देण्यात आले.
रात्री ८ वाजता रुग्णाला कृत्रिम श्वासोच्छ्वासातून बाहेर काढण्यात आले, तर ९ वाजता तिला पूर्णपणे स्थिर अवस्थेत आयसीयूमध्ये हलविण्यात आले.
आता प्रकृती उत्तम
शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशी हिमोग्लोबिन ६.२ ग्रॅम असल्याने आणखी दोन युनिट रक्त देण्यात आले. उपचारांना उत्तम प्रतिसाद मिळाल्याने घटनेच्या पाचव्या दिवशी संबंधित माता पूर्णपणे धोक्याबाहेर असून तिची प्रकृती उत्तम आहे.
'संपूर्ण टीमवर्कमुळेच माता वाचली' – डॉ. लीला करपे
"हा रुग्ण वाचवणे आमच्या संपूर्ण टीमपुढे मोठे आव्हान होते. स्त्रीरोग विभाग, भूलशास्त्र विभाग, रक्तपेढी, पॅथॉलॉजी, आयसीयू, ओटी कर्मचारी आणि नर्सिंग स्टाफ यांच्या उत्कृष्ट समन्वयामुळेच हे शक्य झाले. तसेच अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक मोरे, डॉ. नितीन पुरोहित आणि डॉ. सचिन बोधगिरे यांनी सातत्याने मार्गदर्शन व पाठबळ दिले. त्यांच्या विश्वासामुळे आमचा आत्मविश्वास अधिक वाढला," असे स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. लीला करपे यांनी सांगितले.
जीएमसी हिंगोलीच्या डॉक्टरांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक
दुर्मिळ आणि जीवघेण्या वैद्यकीय गुंतागुंतीतून एका मातेचा जीव वाचविणाऱ्या जीएमसी हिंगोलीच्या डॉक्टरांच्या या कामगिरीचे जिल्हाभरातून तसेच वैद्यकीय क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. डॉक्टरांची तत्परता, अचूक निदान, वेळेवर घेतलेले निर्णय आणि विविध विभागांमधील प्रभावी समन्वय यामुळे एका कुटुंबाला नवजीवन मिळाले असून शासकीय आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

Post a Comment

أحدث أقدم