महावितरणचे हिंगोलीचे अधीक्षक अभियंता राजेशसिंग चव्हाण निलंबित

महावितरणचे हिंगोलीचे अधीक्षक अभियंता राजेशसिंग चव्हाण निलंबित
कामातील कथित अनियमितता व निधी गैरवापराच्या आरोपां प्रकरणी कारवाई; 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
30 जुलै 2026 
हिंगोली, दि. ___ : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण)च्या हिंगोली संवसु मंडळ कार्यालयात कार्यरत असलेले अधीक्षक अभियंता श्री. राजेशसिंग माधोसिंग चव्हाण यांना कामातील कथित अनियमितता आणि शासकीय निधीच्या कथित गैरवापराच्या आरोपांप्रकरणी चौकशी पूर्ण होईपर्यंत सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. हा आदेश सहव्यवस्थापकीय संचालक (प्र) तथा सक्षम अधिकारी धनंजय ऑंढेकर यांनी जारी केला आहे.
निलंबन आदेशानुसार, श्री. चव्हाण हे ८ मे २०२३ पासून हिंगोली संवसु मंडळ कार्यालयात अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात हिंगोली उपविभागातील नरसी नामदेव शाखा कार्यालयांतर्गत ३३/११ केव्ही नरसी उपकेंद्रातून निघणाऱ्या ११ केव्ही सरकाळी गावठाण व ११ केव्ही घोटा गावठाण वाहिन्यांवरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी सुमारे ६ कि.मी. उच्चदाब वाहिनी आणि एक ११ केव्ही फीडर बे उभारण्याचे काम जिल्हा नियोजन योजना २०२५-२६ अंतर्गत मंजूर करण्यात आले होते.
आदेशात नमूद केल्यानुसार, या कामासाठी मे. ए. आर. इलेक्ट्रिकल्स अँड इंजिनियर्स या सूचीबद्ध ठेकेदाराला १४ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्यादेश देण्यात आला होता. संबंधित ठेकेदाराने २६ फेब्रुवारी २०२६ रोजी रु. ५०,३७,६३८ इतक्या रकमेचे बिल सादर केले असून, काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र श्री. चव्हाण यांनी दिल्याचे आदेशात नमूद आहे.
तथापि, मंजूर अंदाजपत्रक आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त प्रशासकीय मान्यतेनुसार प्रत्यक्षात काम पूर्ण झाले नसल्याचे निदर्शनास आल्याचा उल्लेख निलंबन आदेशात करण्यात आला आहे. असे असतानाही संबंधित ठेकेदाराला देयक अदा करण्यात आल्याने महाराष्ट्र शासनाने महावितरणच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीचा कथित गैरवापर झाल्याचा आरोप आदेशात करण्यात आला आहे. तसेच महावितरणच्या नियमांचे आणि कार्यपद्धतीचे उल्लंघन करून शासन व कंपनीचे आर्थिक नुकसान झाल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणातील कथित गैरकृत्य गंभीर स्वरूपाचे असल्याचे नमूद करत महावितरण कर्मचारी सेवाविनियम २००५ मधील सेवाविनियम क्र. ८८ (क) तसेच संबंधित तरतुदींनुसार श्री. चव्हाण यांना पुढील आदेशापर्यंत सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
निलंबन कालावधीत श्री. चव्हाण यांनी दर सोमवार व शुक्रवार सकाळी १० वाजता मुख्य अभियंता, परिमंडळ कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم