हिंगोली शहर वाहतूक शाखेचा शाळा व महाविद्यालयांना इशारा; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई

हिंगोली शहर वाहतूक शाखेचा शाळा व महाविद्यालयांना इशारा; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
29जुलै 2026
हिंगोली, प्रतिनिधी : शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत हिंगोली शहर वाहतूक शाखेकडून सर्व शाळा व महाविद्यालयांना लवकरच विशेष सूचना (नोटीस) बजावण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शेख गफार यांनी दिली.
विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व शाळा बस, व्हॅन, रिक्षा व इतर खासगी वाहनांनी शासनाने घालून दिलेल्या सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर तसेच संबंधित वाहनमालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
वाहतूक शाखेच्या प्रमुख सूचना पुढीलप्रमाणे :
विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वैध विमा (इन्शुरन्स) असणे आवश्यक.
वाहनामध्ये कार्यक्षम फायर एक्स्टिंग्विशर (Fire Extinguisher) उपलब्ध असावा.
वाहनचालक कोणत्याही प्रकारच्या दारू अथवा इतर व्यसनाच्या आहारी गेलेला नसावा.
वाहनाची यांत्रिक स्थिती (फिटनेस) उत्तम असावी व वाहन सुस्थितीत असावे.
विद्यार्थिनींची वाहतूक करणाऱ्या वाहनामध्ये शक्य असल्यास महिला सेविकेची नियुक्ती करण्यात यावी.
वाहनाच्या मंजूर क्षमतेपेक्षा (सीटिंग कॅपॅसिटीपेक्षा) अधिक विद्यार्थी बसवू नयेत.
वाहनातील सर्व सुरक्षा साधने कार्यरत असावीत व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्यात यावी.
पोलीस निरीक्षक शेख गफार यांनी स्पष्ट केले की, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या, अतिप्रवासी वाहतूक करणाऱ्या, तसेच सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही वाहनाला कोणतीही सवलत दिली जाणार नाही. अशा वाहनांवर विशेष मोहीम राबवून तपासणी करण्यात येईल. नियमभंग आढळल्यास संबंधित वाहनावर कायदेशीर कारवाईसह दंड आकारण्यात येईल.
विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून शाळा प्रशासन, वाहनमालक, चालक व पालक यांनी सुरक्षा नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांच्या जीविताचे संरक्षण करावे, असे आवाहनही पोलीस निरीक्षक शेख गफार यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने